अहिल्यानगर
शेतीक्षेत्रात छोटे छोटे उत्पन्नाचे स्रोत घेतले तर शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल – प्रा. डाॅ. मुसमाडे
राहुरी : राज्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकरी वर्गाने शेतीला जोडधंदा दिला आहे म्हणून या पट्ट्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अल्प आहे. शेतीक्षेत्रात छोटे छोटे उत्पन्नाचे स्रोत घेतले तर शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल त्यातून शेतकरी वर्गाला फायदा होऊन त्यांचा स्तर उंचावेल. आगामी काळ हा सामुहिक शेतीचा असला पाहिजे तोच शेतकरी वर्गाच्या उत्थानाचा मार्ग असेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्रज्ञ प्रा. डाॅ. नारायण मुसमाडे यांनी केले.
कोल्हार येथील पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या तालुक्यातील चिंचोली येथे आयोजित करण्यात आलेल्या रासेयो शिबीर्थींना ते संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. प्रकाश पुलाटे तर व्यासपीठावर पत्रकार बाळकृष्ण भोसले, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण तुपे, प्रा. उत्तमराव येवले, प्रा. अश्विनी आहेर, प्रा. मनिषा पवने, प्रा. बाबासाहेब पेरे उपस्थित होते.
डाॅ. मुसमाडे पुढे बोलताना म्हणाले भारत शेती उत्पन्नात निर्यातक्षम देश झाला आहे. शेतकरी वर्गाला सर्वच ग्राहकांनी पाठबळ द्यायला हवं. पारंपारिक शेतीला अधुनिकतेची जोड द्यायला हवी तर शेतीत आवश्यक बाबींचा अंतर्भाव व अनावश्यक बाबी टाळायला हव्यात. सर्वच शेतकरी बांधवात समन्वय असायला हवा. वेगवेगळी पिके घेतली तर बाजारभाव समतोल राहिल. येत्या काळात अन्नधान्ये, फळ पिकांवर विविध प्रक्रिया उद्योग शेतकरी कुटूंबातील तरूणांनी सुरू केले तर अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू होवून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार होवून त्यायोगे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करायला हवा. उपपदार्थांची निर्मिती करून बाजारपेठ विकसित करण्यासाठी तरूणांना संधी असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका माळवे, भारत जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. उत्तमराव येवले यांनी केले.