अहिल्यानगर
कष्टशीलता आणि ज्ञाननिष्ठा जपल्यामुळेच जीवनाला अर्थ आणि आकार मिळाला – साहित्यिक पुंडलिक गवंडी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नव्याने शिक्षण प्रवाहात 1930 ते 1990 या काळात आमची पिढी शिकू लागली, ह्या पहिल्या ग्रामीण पिढीने बदलाचे जग अनुभवले आहे, या काळातील पिढीने कष्टशीलता आणि ज्ञाननिष्ठा मनापासून जपली, त्यातूनच त्यांच्या जीवनाला अर्थ आणि आकार मिळाला, असे उदगार अकोले येथील साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी यांनी काढले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ‘ माझे जीवन आणि साहित्य ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता, त्याप्रसंगी साहित्यिक गवंडी बोलत होते. थत्ते ग्राऊंडजवळील अनारसे बैठक हॉलमध्ये आयोजित या परिसंवादात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्राचार्य शंकरराव अनारसे यांच्या हस्ते साहित्यिक पुंडलिक गवंडी यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. पुंडलिक गवंडी यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1945 रोजी झाला. त्यांचे ‘ हातोडा ‘ हे आत्मकथन 1992 मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी विविध प्रकारची 16 पुस्तके लिहिली आहेत. ‘हातोडा’ मधील शिक्षण घेतानाचे कष्टप्रद अनुभव त्यांनी सांगितले. गुरुवर्य प्राचार्य अनारसे यांनी कठीण परिस्थितीत कसा आधार दिला नि ज्ञानसंपन्न केले, असे अनुभव सांगितले. पुंडलिक गवंडी यांनी लिहिलेल्या ‘चिंतनवेल ‘ व ‘श्रीसाई पुण्यगाथा ‘ या पुस्तकावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरित्र त्यांनी लिहिले त्यावरही चर्चा झाली. लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य टी. ई. शेळके यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये संपादित ‘आनंदयात्री’, ‘मातृपितृ देवोभव’ ही पुस्तके, शाल, बुके देऊन गवंडी यांचा सत्कार केला. प्राचार्य अनारसे यांनी ‘माळावरची माती ‘, ‘फळे रसाळ गोमटी ‘, ‘आम्ही आणि आमचे कुटुंब ‘आदी पुस्तके दिली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या’ फिरत्या चाकावरती ‘डॉ. रामकृष्ण जगताप यांच्या ‘पोरका बाबू ‘ या पुस्तकावर गवंडी यांनी अनुभव सांगितले. 05 एप्रिल 1938 रोजी जन्मलेले प्राचार्य अनारसे, 17 फेब्रुवारी 1942 रोजी जन्मलेले प्राचार्य शेळके, 02 जून 1957 रोजी जन्मलेले डॉ. बाबुराव उपाध्ये या सर्वांच्या लेखनात, पुस्तकात कष्टमय जीवनसंघर्ष आहे. जगावं कसं नि शिकावं कुठं हे प्रश्न होते, केवळ ज्ञाननिष्ठा आणि श्रमशीलता यामुळेच ह्या काळातील पिढी शिक्षण घेऊ शकली, म्हणून त्यांच्या पुढील पिढीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे मत प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले. सौ.कमलताई अनारसे, कु. रेणू जोशी यांनी नियोजन केले तर मंगेश गवंडी यांनी आभार मानले.