राहुरी तालुक्यातून शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती आंदोलनाला पाठिंबा

देवळाली प्रवरा – राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा अभाव, वाढती कर्जबाजारी स्थिती आणि शासनाच्या अपुऱ्या धोरणांमुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होऊन सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी पुण्यात महसूल आयुक्तालयासमोर शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, मोठ्या संख्येने शेतकरी पुण्याकडे रवाना झाले असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी कृष्णा मुसमाडे यांनी दिली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा येथील हनुमान मंदिरात शेतकरी संघटनेची बैठक झाली. संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी नगरसेवक नानासाहेब पठारे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, ॲड. सर्जेराव घोडे, राजेंद्र लांडगे, नानासाहेब कदम यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना ॲड. अजित काळे म्हणाले, “शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी आणि स्व. बबनराव काळे यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. आज त्यांच्या विचारांनाच पुढे नेत आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी लढा देत आहोत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठीच पुण्यात आयुक्तालयासमोर मोठे आंदोलन होणार आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी या लढ्यासाठी एकवटले आहेत.”
महाराष्ट्रातील लहान-मोठ्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था आज अडचणीत आली आहे. शासनाच्या घोषणाबाजीला बळी न पडता शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पुण्यात होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून, दिवसभर संघर्ष करून महसूल आयुक्तांना शेतकरीहिताचे ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीला उत्तमराव कडू, कृष्णराव कदम, सुधाकर कराळे, मच्छिंद्र मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, अरुण खुरुद, शरद आसने, अमोल मोढे, वसंत शेटे, गणेश विघे, चंद्रकांत लासुरकर, अशोक हुडे, लिंबाजी इंगावले, नाना होले, अशोक चव्हाण, दिलीप औताडे, कृष्णा यादव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.