अहिल्यानगर

बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करावा – विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे

राहुरी विद्यापीठ : स्वयंरोजगारातून रोजगाराची निर्मिती करून मूल्यवर्धित बेकरी पदार्थ समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करून द्यावेत. उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची निवड, गुणवत्ता, बेकरी व्यवसायातील स्वच्छता, पॅकेजिंग या बाबींवर विशेष भर दिल्यास बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करता येईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामध्ये दि. 6 ते 10 जानेवारी, 2025 दरम्यान बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, डॉ. बाबासाहेब भिटे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना डॉ. विक्रम कड यांनी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा व महत्त्व विशद केले. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना ब्रेड, बटर, खारी, टोस्ट, नानकटाई, लादीपाव, बनपाव, नाचणी बिस्किट, क्रीमरोल व आयुर्वेदिक कुकिज हे बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब भिटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सविता धनवटे, पोपट खर्से, गोरक्षनाथ चौधरी व सुभाष माने यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणामध्ये एकूण 13 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button