केंद्रीय कामगारमंत्री यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे दिल्लीतील देशव्यापी आंदोलन स्थगित-पोखरकर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शन धारकांचे दि. १० डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले नवी दिल्लीतील धरणे, व आमरण उपोषण आंदोलन केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे तूर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली.
मागील महिन्यात २९ तारखेला कामगार मंत्री मनसुख मांडवीया ह्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली होती व त्या नंतर तुम्हाला परत एका आठवड्याने बोलावतो असे सांगितले होते. पण बोलाविले नाही त्यानुसार दि. ६ डिसेंबर रोजी श्रम मंत्री मनसुख मांडवीया यांनी शिष्टमंडळास दिल्लीत निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय सल्लगार पी एन पाटील, दिल्ली प्रदेश संघटक रमेश बहुगुणा, वीरेंद्रसुंग राजावत या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन श्रम राज्यमंत्री शोभा करंजाले यांची भेट घेतली व त्यांनी तुमचे काम सकारात्मक चालू आहे असे आश्वासन दिले व त्यांनी त्यांचे पर्सनल सचिव मार्फत मंत्री मनसुख मांडवीया यांना निरोप पाठवून शिष्टमंडळ आलेले आहे असा निरोप दिला.
मंत्री मनसुख मांडवीया यांची बैठक संपल्यावर पेन्शनर्स शिष्टमंडळास भेटीला बोलाविले. त्याप्रमाणे सर्व भेटीस गेले असताना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत यांनी सविस्तर कागदपत्रे तपशीलवार दाखवून चर्चा केली. पेन्शनर्स यांच्या अडचणी, प्रश्न मांडले. मंत्री मांडविया यांनी सांगितले की, पेंशनराचे काम होत आहे त्याची चिंता करू नका. त्यावर अशोकराव राउत यांनी सांगितले की, रोज दोन वेळचे जेवण, औषधोपचार खर्च भागत नाही अशी अल्प पेन्शन आहे. रोज सुमारे दोनशे पेन्शनर्स मृत्युमुखी पडत आहेत, म्हणून लवकर निर्णय करावा. त्यावर मंत्री मांडविया यांनी स्पष्ट केले की मी एक दीड महिन्यात आपले काम करतो. त्यासाठी सपोर्टची आवश्यकता आहे. अर्थमंत्री यांचेशी बोललो आहे. ते सुद्धा सकारात्मक झाले आहेत. त्यामुळे निश्चित राहा. तुम्ही आंदोलन केले तर आमच्यावर ताण पडतो. त्यामुळे काम लवकर होत नाही. सर्व स्टाफ, अधिकारी प्रेशरमध्ये जातात. त्यामुळे सध्या आंदोलन करू नका, तुमचे काम निश्चित करतो.
तुम्ही थांबा व माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. जर नाही झाले तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे त्यांनी असे सांगितल्यामुळे तातडीने देशातील वरिष्ठ पदाधिकारी यांची झूम मिटिंग घेण्यात आली. त्यात सर्वांच्या सहमतीने निर्णय जाहीर केला की येत्या ९ डिसेंबर पासून होणारे आंदोलन ते आपण १५ जानेवारीपर्यंत स्थगित करू, व त्यानंतर यावर निर्णय घेऊ असे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राउत यांनी सांगितले. त्यामुळे पेन्शनधारकांनी रेल्वे रिझर्वेशन दिल्लीसाठी केले आहे ते त्वरित रद्द करून आपली रक्कम रिफंड घ्यावी असे आवाहन भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.