नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ काळे यांचे कार्य संतांप्रमाणे – ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत हे नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार आणि कृती करतात, त्यापद्धतीने नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ काळे यांचे समजोपयोगी कार्य हे संतांप्रमाणेच असल्याचे मत ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आचार्य डॉ. कांडेकर महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, आर.एफ. शेख आदी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. संयोजक पतसंस्थेचे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी स्वागत केले तर नगर कार्यालयाचे प्रमुख पोपटराव जमधडे यांनी पतसंस्थेतर्फे सुरु असणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. श्रीसंत नागेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर महाराज यांनी पतसंस्थेचे वेगळेपण सांगताना पुढे म्हणाले की, आजच्या काळात फक्त आर्थिक नफा पाहून उपक्रम केले जातात. परंतु नागेबाबा पतसंस्था ही सेवेचा नफा आणि जनसेवा यातच समाधान मानून समन्वय साधत असल्याचे सांगून ही दिनदर्शिका घरोघरी उपयुक्त असणारी व जीवन संदेश देणारी असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्यामुळे पतसंस्थेशी अनेक लोकांचा संपर्क वाढला आहे. एक शिस्तबद्ध आणि निर्मळ मनाचा सेवाभाव जपणारी ही पतसंस्था कडूभाऊ काळे यांच्या माणुसकीच्या कर्मनात्यातून आकाराला आली आहे. ६७ शाखेचा वाढता पसारा आणि १३०० च्या कोटी ठेवी आहेत. ८०० कोटी कर्ज दिलेले आहे. तर ४०० कोटी सोनेतारण केलेल्या आहेत. भागभांडवाल असणारी ही पतसंस्था प्रगती करणाऱ्याला निवारा देणारी आहे. त्यामुळे ही पतसंस्था लोकप्रिय असल्याचे सांगून ‘दिव्यत्वाचे चिंतन’ व ‘साहित्याचे दीपस्तंभ’ ही पुस्तके देऊन डॉ. उपाध्ये यांनी सर्वांचा सत्कार केला.
यावेळी प्रा. शिवाजीराव बारगळ, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, आर.एफ. शेख आदिंनी नागेबाबा पतसंस्थेच्या आर्थिक आणि सामाजिक सेवाभावाचा आदर्श सांगितला. यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य शेळके यांनी कडूभाऊ काळे यांच्या विचारांचा ‘विचारवेध’ सांगत अर्थकारण हे समाजकारण करणारी नागेबाबा पतसंस्था सर्वांच्या हिताचा विचार करणारी असल्याचे अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
यावेळी रशीद फत्तू शेख, रसित वजीरभाई शेख, भरत गुंजाळ, अजय अहिरे, विलास बारपुते, अन्वर शेख, वसीम शेख, हंसराज आदिक, रवींद्र खिलारी, अजय बनकर, योगेश पंतगे, संदीप आदिक, जयराज धुमाळ, जुनेद बशीर शहा, ओमप्रकाश बनकर आदी उपस्थित होते.आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी आभार मानले.