हितेश ढूमणे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील महांकाळवाडगाव व उंदीरगाव ग्रामपंचायत येथे सन २०१८-१९ या वर्षात हितेश सुधाकर ढूमणे यांनी ग्रामसेवक पदावर राहून ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वतोपरी सहाय्य केले. या प्रशंसकिय कार्याबद्दल त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी जि.प.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते तसेच खा.सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, आ.शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धरामजी सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अ.मुख्य कार्यकारी संभाजी लंगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ढूमणे यांच्या कार्यकाळात २०१८-१९ या वर्षी महांकाळवाडगाव, उंबरगाव ग्रामपंचायत यांना संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. २०१८- १९ उंबरगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार रु १० लाखचे बक्षीस, सन २०१९-२० महांकाळवाडगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार रु १० लाख बक्षीस, सन २०२१-२२ यावर्षी उंदीरगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार विभागून रु ५ लाख बक्षीस मिळाले, अशा अनेक विकास योजना राबविल्या आहेत. या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.