स्वतःवर प्रेम करणारी माणसं यशस्वी होतात – महेश पाडेकर
चिचोंडी येथे रासेयो शिबिरात व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान
राहुरी | जावेद शेख : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करा, स्वतः वर प्रेम करणारी माणसं यशस्वी होतात असे प्रतिपादन मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक महेश पाडेकर यांनी केले आहे.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य महाविद्यालय शेंडी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी व्याख्यानात पाडेकर बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा अतिशय गुणसंपन्न असतो. त्याच्यात समाजसेवा, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्व गुणविकास, स्वावलंबन असे अनेक गुण शिबिरात रुजत असतात. परंतु कॉलेज जीवनात आपण वाम मार्गाला जाण्यापेक्षा, इतरांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करा, ज्ञान असेल तरच आपण श्रीमंत होऊ शकतो, आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करा, वाचन करा, वेळेचे नियोजन करा, शारीरिक, मानसिक व्यायाम करा, परिस्थितीला धरून बसू नका, परिस्थिती माणसाला घडवतही नाही व बिघडवतही नाही परिस्थिती यशाचा अडथळा ठरू शकत नाही अशा विविध विषयांवर दाखले देऊन विद्यार्थ्यांना पाडेकर यांनी मार्गदर्शन केले. ध्येय निश्चित असणे गरजेचे आहे तरच आपण प्रयत्न करू, जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात जी डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात अशा विविध विषयांवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी मनोहर लोटे, सहकार्यक्रम अधिकारी सागर तारगे, भाऊराव भागडे, विठ्ठल धिंदळे, त्र्यंबक बांडे, चंद्रकांत मंडलिक, अंकुश फोडसे, हासे मॅडम आदी प्राध्यापक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका स्नेहल बनसोडे तर आभार नेहा सगभोर हीने मानले.