शाश्वत शेतीसाठी रोबोटीक्स, आयओटी, डिजीटल ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात पदार्पण करतांना विकसीत भारत 2047 ला लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये डिजीटल व माहिती तंत्रज्ञानाचा सर्वांगीण वापर करणे आवश्यक आहे. 2047 मध्ये जगाची लोकसंख्या 970 कोटी अपेक्षीत असतांना भारताच्या वाढत्या लोकसंखेस अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी कृषि क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेणे आवश्यक आहे. माती, पाणी, हवा, इंधन यांची गुणवत्ता एका बाजुने घसरत असतांना वेगाने बदलत चाललेले हवामान हे कृषि क्षेत्रातील आव्हानाची दुसरी बाजु आहे. त्यासोबत शेती क्षेत्रापासून दुर चाललेले तरुण, शेतीत कमी होत चाललेले मनुष्यबळ यांचा विचार करता शेतीमध्ये स्वयंचलीत यंत्र आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रांतर्गत दोन दिवसीय भविष्यातील शेती या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनात एक आंतरराष्ट्रीय परिषद व पाच आंतरराष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या परिसंवादाचे प्रमुख पाहुणे म्हणुन इंग्लंड येथील ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे, प्राध्यापक डॉ. अजीत जावकर, प्रमुख उपस्थितीमध्ये कास्ट प्रकल्पाचे आणि भा.कृ.अ.प.-रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल, गुजरात येथील आंनद कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.बी. कथारीया, संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार आणि कास्ट प्रकल्पाचे संशोधक डॉ. मुकुंद शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले भारतामध्ये 15 ते 29 या वयोगटातील तरुणांची संख्या सुमारे 35 कोटी असून त्यातील ग्रामीण भागातील तरुणांची संख्या 20 कोटी आहे. हे तरुण शेतकरी पारंपारिक शेती पेक्षा तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी उत्सुक आहे. अशा शेतकर्यांसाठी कमी मनुष्यबळ व कष्ट कमी होण्याच्या दृष्टिकोनातून उच्च तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
या संमेलनात आधुनिक कृषि तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आणि कृषिमध्ये ड्रोनचा वापर, कृषिमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता व हायपरस्पेक्ट्रल इमेजेस, इनडोअर फार्मिंग, कृषिमध्ये यंत्रमानवाचा उपयोग, कृषिमध्ये आय.ओ.टी. चा वापर या पाच विषयांवर परिसंवाद होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अजीत जावकर मार्गदर्शन करतांना म्हणाले बदलत्या हवामानातील आव्हानांचा विचार करता कृत्रिम बुध्दीमत्तेच्या ज्ञानाची देवाण-घेवान करत विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देवून कार्यप्रवृत्त करणे काळाची गरज आहे. त्या अनुशंगाने सॅटेलाईट, ड्रोन, सेन्सर, सॉफ्टवेअर यांचा वापर केल्यास कृषिमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा पाया भक्कम होईल असे ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
डॉ. अनुराधा अग्रवाल आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की भारत सरकार व जागतीक बँकेच्या सहकार्याने सन 2018-19 पासून राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पाची (नाहेप) सुरुवात करण्यात आली. भारताची कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून या प्रकल्पामध्ये सुधारीत अभ्यासक्रम, विद्यार्थी व शास्त्रज्ञांमध्ये क्षमता वृध्दी, शिक्षणाच्या अनुभवाचे समृध्दीकरण यांचा समावेश विशेषता करण्यात आल्याचे नमुद केले. देशात नाहेप अंतर्गत सुरु झालेल्या 16 कास्ट प्रकल्पांमध्ये राहुरी कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट कृषि शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, कृषि क्षेत्राची प्रतिमा उंचविणे आणि कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करुन गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाची वाटचाल करणे हे आहे. या गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाचा उपयोग उच्च प्रतीच्या संशोधनासाठी होणे गरजेचे आहे. असे झाल्यास भारतातील कृषि क्षेत्रासाठी डिजीटल तंत्रज्ञान या संकल्पनेतून भारतीय कृषि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुनील गोरंटीवार यांनी मफुकृवी कास्ट प्रकल्पाचा मागील पाच वर्षाचा आढावा सादर केला. यावेळी कास्ट प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेला क्लायमेक्स-2022 मध्ये मिळालेला निधी कृषि महाविद्यालय, पुणे, धुळे, कोल्हापूर आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी यांच्या सहयोगी अधिष्ठातांकडे कृषि उद्योजकतेला चालना देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोणारेचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे,अमेरीकेतील शास्त्रज्ञ टॉम क्राम, रॅन्ड स्वॉनसन, अभिलाश चंदल, रीया किशोरी, बँकॉक येथील शास्त्रज्ञ डॉ. मंजूल हजारीका, व्हिएतनाम येथील शास्त्रज्ञ डॉ. हा नाम थांक, जपान येथील शास्त्रज्ञ डॉ. असाई थांबी मानीकाम, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, माजी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते. या दोन दिवस चालणार्या राष्ट्रीय संमेलनात विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, बाहेरच्या देशातील शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यामधील शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय परिसंवादाचे ऑनलाईन स्ट्रिमींगद्वारे जगातील शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली बिरादार यांनी तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले.