शासकीय वाळू विक्रीतील त्रुटी दूर करू; महसूलमंत्री विखे-पाटील यांची माहिती
वांगी येथील शासकीय वाळू डेपोचे ना. विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राज्य सरकारने ६०० रुपयांत वाळू विक्रीचे धोरण अवलंबिले आहे. या धोरणात काही प्रमाणावर त्रुटी असल्या तरी त्या निश्चित दूर होतील, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे व वांगी येथे शासकीय वाळू डेपो केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने विखे पाटील यांच्या हस्ते काल मंगळवारी करण्यात आले, त्याप्रसंगी विखे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकाला स्वस्तात वाळू मिळावी तसेच वाढणाऱ्या गुन्हेगारी देखील आळा बसावा यासाठीच शासनाने शासकीय वाळू डेपोचे धोरण अवलंबिले आहे. याचा निश्चित सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत असल्याचे देखील महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी शासकीय वाळू डेपो कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात शासकीय वाळूची योग्य पद्धतीने विक्री करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नव्याने सुरू होत असलेल्या दोन्ही केंद्रावरून एक लाख ८० हजार ब्रास वाळूची शासकीय डेपोतून विक्री होणार आहे. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूकीला निश्चित आळा बसणार आहे. सध्या आठ शासकीय वाळू डेपो केंद्रातून लाभार्थींना स्वतातून वाळू मिळणार आहे. तसेच खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय देखील महसूल मंत्री नामदार विखे पाटील यांनी घेतला. त्याचे देखील शेतकरी वर्गातून स्वागत केले जात असल्याचे भाजपचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रांत अधिकारी किरण सावंत पाटिल, बाजार समितीचे संचालक नानासाहेब पवार, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, लक्ष्मणराव भवार, रवी पाटील, महेंद्र पटारे, अंकुश पटारे, सुभाष पटारे, संजय भिसे, प्रसाद सतोरे, मंडल अधिकारी शिंदे मॅडम, तलाठी अशोक चितळकर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.