राजकीय
श्रेयासाठी कधीही काम केले नाही : शेलार
श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : आजमितीला तालुक्यातील पाणीप्रश्न बिकट असताना राहुल जगताप आमदार होते त्यावेळी आमदार बबनराव पाचपुते हे पाणीप्रश्नी जगतापांना जबाबदार धरायचे, आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.
यावेळी शेलार पुढे म्हणाले की, मी श्रेय मिळावे म्हणून राजकीय जीवनात कोणतेच काम केले नाही, पाणीप्रश्न माझी जबाबदारी नाही, पण शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व पाणीप्रश्न शेतकऱ्यांच्या जिवनातील जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे कायमच पाणीप्रश्नी संघर्ष केला व पुढेही करत राहील. आज कुकडीच्या पाणीप्रश्नी काहीजण माझ्या भूमिकेविषयी संशय निर्माण करतात, पण लोक त्यांना थारा देणार नाहीत, प्रत्येकाने बोलावे, पण अभ्यास करून बोलावे, असा चिमटा शेलार यांनी नाव न घेता काढला. डिंबे ते येडगाव कालव्याचे डिझाईनच चुकले असून, डिंबे ते माणिकडोह बोगदाप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहोत. श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या गॅस पाईपलाईनच्या ठेकेदारास कोणी किती लाख मागितले, याची चौकशी करावी, जो दोषी असेल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, आरोप करणाऱ्याने हवेत बोलण्याऐवजी नाव जाहीर करावे, असेही शेलार म्हणाले. या वेळी हरिदास शिर्के, संजय आनंदकर, भाऊसाहेब खेतमाळीस, बाळासाहेब शेलार उपस्थित होते.
तालुक्यात औद्योगिक वसाहत होणे काळाची गरज आहे. ती होणार अशी घोषणा ४१ वर्षापूर्वी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली होती. ती अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. अजूनही घोषणाच होत आहेत. ती व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी सांगितले.