अहिल्यानगर
राजस्थान येथील चिमुकल्याचा शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीतील मृत्युच्या घटनेचा कोल्हारला निषेध
राहुरी | बाळकृष्ण भोसले – राजस्थानातील जालौर येथील तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या लहान चिमुकल्याला ‘माझ्या माठातील पाणी का प्याला ‘ या कारणावरून शिक्षकाच्या अमानुष मारहाणीत मृत्यु ला कवटावळे लागले. या घटनेचा कोल्हार येथे समता जनविकास समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थान राज्यातल्या जालौर येथील घटना भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी मनुवादी मानसिकतेचे उदाहरण ठरले आहे. आजही दलित आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या घटनेतून अधोरेखित होत आहे. ‘फुल उमलण्यापूर्वीच कळी खुडण्याची मानसिकता’ हे आजचे वास्तव आहे. असा प्रकार तिसरी इयत्तेत शिकत असलेल्या नि फक्त तहान लागल्याने सार्वजनिक ठेवलेल्या माठातून चिमुकला पाणी पिल्याने सदरच्या विद्यापित्याने या लहानग्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत त्या चिमुकल्याचा मृत्यु झाला. जात यावरून समाजात विभागणी आहे नि ती दरी वाढत चालली आहे. राजकारणी मंडळी या जात विभाजनाला मत मिळण्यासाठी आणखी रूंदावत चालली आहे.
या घटनांना पायबंद घालून एकसंघ समाज निर्मितीसाठी शासन स्तरावरून प्रयत्नांची गरज आहे. समता जनविकास समिती अशा घटनांचा फक्त निषेध न करता या घटना घडू नयेत यासाठी प्रबोधन मेळावे घेत नकारात्मकतेकडून सकारात्मकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या समितीचे कोल्हार शहर अध्यक्ष राजेंद्र बर्डे, उपाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनंजय लोखंडे, सदस्य सुनिल बोरूडे, जालिंदर थोरात, बाळासाहेब गायकवाड, प्रविण लोखंडे, प्रभाकर लकारे, विष्णू माळी, बाळासाहेब बोरूडे, विजय गोहर, शाम लोखंडे, बाळासाहेब रंगनाथ बोरूडे, सुनिल बोरूडे, पवन निकम, छोटू गोसावी यांनी सांगितले आहे