प्रामाणिक पत्रकारिता आणि जीवनमूल्यांची प्रतिष्ठा जपल्यामुळेच शासन व समाजाने घेतलेली दखल प्रेरणादायी – पत्रकार प्रकाश कुलथे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पत्रकारिता ही लोकशाहीची शक्ती आणि भक्ती असून सेवाभावी पत्रकार हा समाजाचा मित्र असतो. लोकशाहीचा चौथा खांब आहे, या विचारातून मी गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिक कार्य व जीवनमूल्यांची प्रतिष्ठा जपल्यामुळेच शासन आणि समाजाने घेतलेली दखल प्रेरणादायी आहे, असे उदगार दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक व नुकतीच अधिस्वकृतीपदी निवड झालेले पत्रकार प्रकाश कुलथे यांनी काढले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार, माऊली साहित्य प्रतिष्ठानतर्फे पत्रकार प्रकाश कुलथे यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समिती सदस्यपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ प्रकाश कुलथे यांचा सौ. स्नेहलता कुलथेसह सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून फेटा, शाल, बुके, पुस्तके देऊन कुलथे यांचा सपत्नीक सत्कार केला.
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज यांच्यावरील ‘उसगावचा संतमहिमा’ पुस्तके उपस्थित सर्वांना देऊन शाल, बुके देऊन सन्मान केले. प्रकाश कुलथे आणि सौ. स्नेहलता कुलथे हॆ दोघे पत्रकार, साहित्य, ग्रन्थप्रकाशन सामाजिक क्षेत्रातील भूषण आहेत. पत्रकार कुलथे यांची निवड झाली हॆ त्यांच्या चरित्र आणि चारित्र्यशील पत्रकारितेचे फळ असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार, माऊली साहित्य प्रतिष्ठान, भूमी फाऊंडेशन यांच्यातर्फे प्रकाश कुलथे यांचा सन्मान करून कुलथे परिवाराने नेहमीच साहित्यिकांना नवे बळ आणि प्रतिष्ठा दिली, असे सांगून एका जीवनसंघर्ष वाटेवरील ही निवड त्यांचा बहुमान आणि नव्या युवकांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.
प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून कुलथे परिवाराचा आदर्श सांगितला. श्रीरामपूर परिसरातील साहित्यिक आणि सेवाभावी संस्था, व्यक्तींनी कुलथे यांच्या निवडीबद्दल केलेले सत्कार गौरवास्पद आहेत, असे सांगून भानू काळे लिखित स्व. ॲड. रावसाहेब शिंदे चरित्र ‘अजुनी चालतोची वाट’ हा ग्रन्थ, शाल, बुके देऊन सन्मान केला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर भूमी फाऊंडेशनचे सदस्य पत्रकार बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.