राक्षसवाडी पाझर तलावात विनापरवाना गौण खनिज उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
श्रीगोंदा | प्रतिनिधी : कर्जत- श्रीगोंदा तालुक्यातील राक्षसवाडी तलावात विना परवाना गौण खनिज उत्खनन सुरू आहे. प्रशासनाने या रात्रंदिवस चालणार्या उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत या तस्करांची मजल गेल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करुन शासनाचा कर चुकवून लाखो रुपये कमवणार्या तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राक्षसवाडी तलावातील अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार मशीन मालकाने कोणत्याही प्रकारची परवानगी काढलेली नाही. तरी मी स्वतः यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करीन.
धुळाजी केसकर, मंडल अधिकारी कुलधरण, ता. कर्जत
सविस्तर वृत्त असे की, कोपर्डी गावातील संतोष गांगर्डे नामक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी राक्षसवाडी तलावात स्वतःच्या मशीनने विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून मोठ्या प्रमाणात माती, वाळू व मुरुमाचा उपसा करून महाराष्ट्र शासनाचा गौण खनिज उत्खननच्या माध्यमातून येणारा कर न भरता शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे.
पाझर तलावातील गौण खनिज उत्खनन हे जर हिरडगाव हद्दीतील असेल तर माझ्या माहितीप्रमाणे श्रीगोंदा तहसीलदार महसूल विभागातुन कोणत्याही प्रकारची परवानगी काढलेली नाही. मी त्यांना समझ देऊन पाहणी करून कारवाई करतो.
मिसाळ भाऊसाहेब, तलाठी हिरडगाव ता. श्रीगोंदा
अशातच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना हे उत्खनन चालू असल्याचे पाहुन उत्खनन सुरू असलेल्या हिरडगाव येथील शेतकरी संजय दरेकर, ऋषिकेश दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, भाऊ दरेकर व गणेश दरेकर यांनी मशीन मालक संतोष गांगर्डे यांना परवाना काढला आहे का ? अशी विचारणा केली असता तुम्ही परत आलात तर मशीन खाली घालून जीवे मारीन, असा दम भरून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.
राक्षसवाडी तलावातील गौण खनिज उत्खनन हे बेकायदेशीर चाललेले असुन उत्खनन हे श्रीगोंदा व कर्जत या दोन्ही तालुक्यातील क्षेत्रात आहे. मशीन मालक हा कोपर्डी ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा असुन राजकीय वजन वापरून महाराष्ट्र शासनाची फसवणूक करीत आहे, योग्य कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल.
सुभाष दरेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख क्रांतीसेना
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार गौण खनिज उत्खनन केल्यामुळे विहिरीचे पाणी कमी झाल्याने पिके जळून चालली आहेत. राक्षसवाडी तलावातील क्षेत्र हे कर्जत व श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यातील असल्याने हिरडगाव व कोपर्डी येथील प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुठेही रॉयल्टी भरलेली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शासनाचा कर बुडविणार्या तस्करांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी क्रांतीसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आमच्या प्रतिनिधीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोपर्डी येथील तलाठी मनसुक दरेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला नाही.
राक्षसवाडी पाझर तलावात आमची जमीन संपादीत करण्यात आली होती. तलावात आठ दिवसांपासून गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आम्ही मशीन मालक गांगर्डे यांना परवाना काढला का ? विचारले असता आमच्या अंगावर मशीन घालण्याचा प्रयत्न केला व जीवे मारीन अशी धमकी दिली.
ज्ञानेश्वर दरेकर, शेतकरी हिरडगाव.