अनेक वर्षांनी मैत्रिणींचा मनोमिलन स्नेहमेळावा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ज्या सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयाने शिक्षिका होण्यासाठी अध्ययनासह अनेक कलागुणांना वाव दिला. जीवनातील समस्या तसेच खडतर मार्गातून मार्गक्रमण करण्याचे धडे दिले. आज त्या माजी विद्यार्थीनींना सुंदर जीवन जगायचे भाग्य लाभले. अशा या काॅलेजची व मैत्रिणींची आठवण येणे सहाजिकच आहे. म्हणून सर्वांनी भेटायचे ठरवले व फोनद्वारे संपर्क केला. फणसे व पुजारी यांच्या योगदानातून अनेक मैत्रिणींची यादी तयार झाली.
बघता बघता 16 एप्रिल चा दिवस उजाडला आणि सकाळी 10 पासून काळे लाॅन्सवर मैत्रिणींची लगबग सुरू झाली. अल्पावधितच सर्व मैत्रिणी जमा झाल्या. त्यांचे स्वागत करण्यास धुमाळ, सोळस आणि बुद्धिवंत सज्ज होत्या. प्रत्येकीचे गुलाब पुष्प देऊन औक्षण करण्यात आले. काय आणि किती बोलावं कळेनासे झाले होते. सर्व मैत्रिणींनी स्वतः चा परिचय करून दिला. गोसावीताई गुंजाळ, परदेशी, धुमाळ यांनी आपले सुंदर विचार मांडले. नंतर धुमाळ सोळस यांच्या मार्गदर्शनाखाली काही रंजक गेम्स घेऊन बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
सुरूचि भोजनाच्या आस्वादानंतर संगिताच्या तालावर गवळी, तांबे, प्रमिला, परदेशी इतर मैत्रिणींनी आपल्या नृत्यातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येकीचा चेहऱ्यावरील आनंद टिपण्यासारखा होता. पावले जड पडली होती, पण पुढील स्नेहमेळाव्याचे स्वप्न उराशी बाळगून सगळ्या जणी आपापल्या घरी परतल्या व स्नेह मेळाव्याची सांगता झाली.