कृषी
जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच भविष्यात शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक मृदा दिनाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न, ठराविक पिकांचे उत्पादन घेवून जमिनीला विश्रांती द्यायला हवी. जमिनीतील सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे या सारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष दिले तरच भविष्यात जमीन शाश्वत उत्पन्न देईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन, कृषि विभाग, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर्स लि., मुंबई व तिफण फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जागतीक मृदा दिन व राज्यस्तरीय बिजप्रक्रिया स्पर्धा पारितोषीक वितरण सोहळा हा कार्यक्रम डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे येथील विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडी, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर लि., पुणेचे उपमहाव्यवस्थापक मधुकर पाचारणे, नियंत्रक तथा मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे, अहमदनगरचे कृषि सहसंचालक रविंद्र माने, राहुरी तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, तिफण फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव जमधडे व अहमदनगर येथील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर लि.चे विभागीय व्यवस्थापक नितिन बाजड उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी खराब होत आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील 10 हजार एकर जमिनीवर क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम सुरु केला आहे. पाचट न जाळता त्याचे व्यवस्थापन करुन खोडवा उसाची उत्पादकता 50 टनावरुन 77 टनापर्यंत वाढली आहे. भविष्यात पाण्याची प्रत सुधारण्याबरोबरच जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की पुर्वी शेतकर्याचे जीवन नक्षत्राबरोबरच पर्यावरणाशी जोडलेले होते.
आदर्श जीवन पध्दतीबरोबरच आनंदी पध्दतीने जीवन जगण्याची कला त्याला अवगत होती. परंतु सध्या हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम भारतीय शेतीवर होत आहे. आपल्याला भविष्यात शेतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी भरड धान्याचा वापर वाढवून गहू तसेच तांदुळ याचा आहारातील वापर कमी करावा लागेल. शेतीच्या उज्वल भविष्यासाठी पाण्याच्या ताळेबंदाबरोबरच मातीचे व्यवस्थापन हे जर व्यवस्थीत केले नाही तर आपण कितीही विकासाचे गोडवे गायले तर आपले प्रश्न सुटनार नाहीत. विद्यापीठाचा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प हा देशाला दिशादर्शक ठरणार आहे असेही ते यावेळी आवर्जुन म्हणाले.
यावेळी रफिक नायकवाडी व मधुकर पाचारणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले. हळगांव कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी अंगद लाटे यांनेही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धा-2022 या ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या राज्सस्तरीय स्पर्धेतील यशस्वी स्पर्धेकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, हाळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे व कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल दुरगुडे व डॉ. रितू ठाकरे यांनी अनुक्रमे माती परिक्षण आणि जमिनीचे आरोग्य व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तिफण फाउंडेशनच्या संचालीका श्रीमती अंजना सोनवलकर व मंडल कृषि अधिकारी डॉ. विनया बनसोडे यांनी तर आभार खरिप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धेचे राज्य समन्वयक अनंत देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील तसेच कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले शेतकरी तसेच हाळगांव कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.