ठळक बातम्या
गौण खनिजाअभावी निळवंडेचे काम बंद पाडणारे कोण? जिरायत भागाने ओळखावे – सौ. घोगरे
लोणी खुर्द : उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ५२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे मुख्य कालव्यांची कामे गौण खनिजा अभावी बंद पडले आहेत. मात्र प्रकल्पाला खडी व दगड मिळु नयेत व काम बंद पडावे यामागे कोणाची भुमिका आहे. हे जिरायत भागाने ओळखावे असे आवाहन लोणी खुर्दच्या कृषीभुषण सौ.प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने जिरायत शेतकऱ्यांचा तळतळाट न घेता निळवंडेस आवश्यक असलेले गौणखनिज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील लोणी खुर्दसह दुष्काळी १८२ गावातील ६८ हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव ५२ वर्षापूर्वी करण्यात आला. धरणात दहा वर्षापासुन पाणी साठविले जात आहे. मात्र कालव्यांची कामे रेंगाळल्यामुळे लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूदही केली होती. त्यामुळे या वर्षाअखेर मुख्य कालव्याचे काम पुर्ण होवुन डिसेंबर मध्ये कालव्याची चाचणी होणार होती. मध्येच सरकार बदलले व आडमुठे धोरणामुळे निळवंडे सारख्या ५२ वर्षापासुन रेंगाळलेल्या प्रकल्पाला गौणखणीज मिळणे बंद झाल्याने निधी असुनही सुरू असलेली कालव्यांची कामे ठप्प झाली आहेत.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावर लोणी खुर्द हे गाव राहाता तालुक्यातील सर्वात मोठे व जास्त क्षेत्र असणारे गाव आहे. तसेच निळवंडेचे पाणी आल्यास लोणी परिसरासह जिरायत गांवानाही मोठा फायदा होणार आहे. शिर्डी मतदार संघाचे प्रथम आमदार स्व.चंद्रभान दादा घोगरे कायमच या प्रकल्पासाठी आग्रही होते. विषेश म्हणजे त्याच्या आमदारकीच्या काळातचं निळवंडे प्रकल्पाला पहिली मान्यता मिळाली. मात्र काहीनी जाणीव पुर्वक निळवंडेस आडकाठी घातल्याने प्रकल्प गेले ५२ वर्षांपासुन रेंगाळला आहे. आताही गौणखणीजांच्या आडुन प्रकल्प वेळेत पुर्ण होवु नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
समृध्दी प्रकल्पासाठी मंत्रीमंडळाने खास बाब म्हणुन दंड माफ करून गौण खनिज उपलब्ध करून दिले. मात्र निळवंडे प्रकल्पाला खडी व दगड मिळु नयेत व काम बंद पडावे यामागे कोणाची भुमिका आहे. हे जिरायत भागाने ओळखावे असे आवाहन लोणी खुर्दच्या कृषीभुषण सौ.प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने जिरायत शेतकऱ्यांचा तळतळाट न घेता निळवंडेस आवश्यक असलेले गौणखनिज उपलब्ध करून दयावे पन्नास वर्षापासून मोठ्या चातकाप्रमाणे डोळे लाऊन जिरायत भागातील शेतकरी निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहतोय तरी त्याचा अंत न पाहता धरणाच्या कालव्यासाठी गौणखनिज उपलब्ध करुन द्यावे. अशा मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.