गुन्हे वार्ता
बस चालकाला पिस्तूलचा धाक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : टाकळीभान शिवारात सकाळी 10 वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते शिर्डी जाणारी बस क्रमांक MH 40 BL 4180 श्रीरामपूर कडे येत असताना वीट भट्टीजवळ स्विफ्ट कार क्र. MH16 AB 4046 मधील आरोपीने बसला गाडी आडवी लावून कट का मारला ? या कारणावरून आपले जवळील पिस्तूल काढून बस चालकावर रोखले व जीवे मारण्याची धमकी दिली. बस मध्ये प्रवास करत असलेले पो. कॉ.विलास उकिरडे यांनी समय सूचकता दाखवत सदर घटनेची माहिती तात्काळ डीवायएसपी संदीप मिटके यांना दिली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह रवाना होत टाकळीभान परिसरात स्विफ्ट कारचा सिने स्टाईल पाठलाग करत आरोपी नामे लक्ष्मण शिवाजी आरे वय 32 वर्ष रा.गुलटेकडी, मार्केट यार्ड पुणे, यास पिस्टूलसह जेरबंद केले.
सदर घटनेत आरोपी बस चालकावर फायरिंग करण्याची धमकी देत असल्याने बस मधील प्रवासी भयभीत होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. डीवायएसपी संदीप मिटके यांनी प्रसंगावधान ओळखून आरोपीस शिताफिने जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला व बस मधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला व सदर कारवाईबाबत त्यांचे व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले. आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पो.स्टे. येथे बस चालक संजय फ्रान्सिस गायकवाड यांचे फिर्यादीवरून गुन्हा क्र.359 / 2022 भारतीय दंड संहिता कलम 353, 341, 186, 504, 506 शस्त्र अधिनियम 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पीएसआय बोरसे, एचसी सुरेश औटी, भारत जाधव, पीसी विलास उकिरडे यांनी केली.