अहिल्यानगर
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे यांचा ‘शब्दगंध’ च्या वतीने सत्कार
राहुरी | बाळकृष्ण भोसले – ऐतिहासिक परंपरा असलेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतील लेखक मित्र पौलस वाघमारे यांची निवड होणे ही साहित्य चळवळीतील आम्हा सर्व मित्रांसाठी आनंददायी गोष्ट असून हे संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली निश्चितच यशस्वी होईल, असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात त्यांच्या हस्ते २६ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पौलस वाघमारे यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, कवी सुभाष सोनवणे, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना सुनील गोसावी म्हणाले की, पौलस वाघमारे महाविद्यालयीन जीवनापासून लिहीत असून ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतर साहित्य वर्तुळात ते परिचित आहेत. त्यांच्या नावावर चार कवितासंग्रह, एक कथासंग्रह, एक अनुवादित पुस्तक, दोन अल्पचरित्र यासह एकूण नऊ पुस्तके प्रसिद्ध असून कृष्णाकाठच्या कथा या दूरदर्शन मालिकेचे शीर्षक गीत ही त्यांनी लिहिले आहे. अहमदनगर येथील सीएसआरडी मध्ये त्यांचे एम.एस. डब्ल्यू.चे प्रशिक्षण झालेले असून त्या काळात झालेल्या अनेक काव्य संमेलनामध्ये ते सहभागी झाले होते. शब्दगंधच्या वतीने त्याकाळी प्रकाशित करण्यात येत असलेल्या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.असा आमचा मित्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याने अतिशय आनंद होत आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पौलस वाघमारे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या त्या कारणाने संमेलन मागे पडलेले होते, महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांनी बीड येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचा आभारी आहे,मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेला या माध्यमातून सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
यापूर्वी या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून लक्ष्मीबाई टिळक, निरंजन उजगरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा. सुधीर शर्मा व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक देवदत्त हुसळे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाध्यक्ष पद भुषवले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर भगवान राऊत यांनी आभार मानले. कवी सुभाष सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्ञानदेव पांडूळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, बबनराव गिरी, शाहीर भारत गाडेकर, राजेंद्र फंड, किशोर डोंगरे, डॉ.रमेश अबदार, एस.के.मोटे, सचिन हुसळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.