शिक्षणवारी ज्ञान पंढरी
के.एल.पोंदा हायस्कूल येथे मातीकामातून विविध कलानिर्मिती
अहमदनगर | जावेद शेख : दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळा के.एल.पोंदा हायस्कूल येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सेवा पंधरवडा, भारताचे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. या विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका अनुपमा जाधव यांनी केले. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात हस्तकला, मातीकाम कार्यानुभव, कला या विषयांवर मार्गदर्शन करुन त्यांना मातीकामातून विविध कलानिर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र बागेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला गेला. या कार्यक्रमात शाळेचे उप मुख्याध्यापक मिलिंद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अनुपमा जाधव मॅडम यांनी स्वागत केले. व कार्यक्रमाचा उद्देश, महत्व समजावून सांगितले. कला असे मानवाशी भूषण, कला म्हणजे सत्य शिव आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम असला तरी आनंदी जीवन जगण्याची कला श्रेष्ठ आहे. गोजिरवाण्या, चिमुकल्या या बाल कलाकारांनी अतिशय सुंदर विविध प्रकारच्या मातीकामातून कला निर्मिती केल्या. हे भावी कलाकार, शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार अनुपमा जाधव यांनी काढले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यात त्यांनी मातीच्या गणपतीच्या मूर्ती, शंकराची पिंड, सफरचंद, पेरु, सिताफळ, डाळिंब,केळी, द्राक्ष,आंबे, स्ट्रॉबेरी, अंजिर, मोसंबी, गुलाबाचे फूल, अनेक प्रकारची मातीची फळे, फुले तयार केले. हे सर्व नैसर्गिक आहेत. खरोखरच ताजे व टवटवीत वाटत होते. स्व निर्मितीचा आनंद काही औरच..! विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पालकांचे देखील सहकार्य असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळेचे उप मुख्याध्यापक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या धातूंची माहिती सांगून, मातीच्या वस्तूचे महत्व सांगितले. संपूर्ण या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. भविष्यात या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांसाठी काही सहाय्य, मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही नक्कीच मदत करु, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अमर सिंह याने सुंदर श्री गणेशाची मूर्ती तयार केली. या मातीकाम निर्मिती बद्दलचा त्याचा अनुभव व आनंद आपल्या मनोगतात व्यक्त केला. कु.खुशी शाह हिने सिताफळ, कु.आस्था यादवने सफरचंद पेरु, विविध प्रकारच्या केळी, कु.अंजली रावत्याने गणपतीची मूर्ती, व अनेक प्रकारची फळे तयार केली. कु.साधना सोनकरने सुंदर फळे तयार केली. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.अनन्या यादव हिने केले.
या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक रविंद्र बागेसर, उप मुख्याध्यापक मिलिंद पाटील,पर्यवेक्षक सुनील मोरे, शिक्षक, पालक यांनी आयोजक अनुपमा जाधव मॅडम व सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक केले.