अहिल्यानगर
सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार भोर यांना जाहीर
संगमनेर प्रतिनिधी : सरपंच सेवा संघाच्या वतीने ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार २०२१ हा अखिल भारतीय क्रांतिसेनेचे संगमनेर युवक अध्यक्ष पेमगिरीचे बाळासाहेब भोर यांना जाहीर करण्यात आला आहे.अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून भोर यांनी नेहमीच विविध सामाजिक प्रश्न, मागण्या रोखठोक व प्रभावीपणे मांडल्या आहेत.राज्यशास्त्र विषयातून पदवीधर असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या धारदार व सर्वसामावेशक लेखणीतून पत्रकारिता, शेती, पर्यावरण, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात लेखन करून नेहमीच समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषकरून त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या खास शैलीत अनेक ज्वलंत प्रश्नांवर लेख लिहून चुकीच्या व्यवस्थेच्या वर्मावरच वेळोवेळी नेमकी बोट ठेवलं आहे. भोर हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही जिद्द व संघर्षातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. नेहमीच पडदयाच्या आड राहून देखील त्यांनी प्रश्न कोणताही असो तो रोखठोक, निर्भीड व प्रभाविपणे मांडण्याचा त्यांचा एक विशेष हातखंडा आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे .हा सन्मान सोहळा ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सरपंच सेवा संघाच्या वतीने ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार २०२१ हा अखिल भारतीय क्रांतिसेनेचे संगमनेर युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर यांना जाहीर झाल्याबद्दल क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे पाटील, पक्षाचे सरचिटणीस नितीन देशमुख, संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.