कृषी
वांबोरी मंडळातील अतिवृष्टीपिडीत शेतकऱ्यांना ४४ लाखांची नुकसान भरपाई – आ. तनपुरे
राहुरी | बाळकृष्ण भोसले – ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुरी तालुक्यातील वांबोरी मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले त्या प्रयत्नास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ४४ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, वांबोरी मंडळात धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, बाभुळगाव, वरवंडी, सडे, कुक्कडवेढे, कात्रड, गुंजाळे व वांबोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेत पिकांचे नुकसान झाले होते. सुमारे १०५ मिलिमीटर पाऊस पडला होता.
शासन नियमाप्रमाणे जिरायत भागासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायत साठी हेक्टरी २७ हजार रुपये तर फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये असे अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वांबोरी मंडळात ४५४ हेक्टर क्षेत्रासाठी ४४ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावे व भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांचेकडे मागणी केली होती. श्री तनपुरे यांनीही शासन दरबारी पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिले. संबंधित शेतकऱ्यांनी श्री तनपुरे यांचे आभार मानले.