राजकीय
नाशिक पदवीधर निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार : डॉ. विजय मकासरे
राहुरी : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 1 नोव्हेंबर पासून या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या तयारी अंतर्गत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विजय मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट घेत नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे काम असलेले श्रीरामपूर येथील डॉ. मॅक त्रिभुवन यांना मिळावी अशी मागणी केली आहे.
५४ तालुके व ५ जिल्ह्याचा विस्तीर्ण असा नाशिक पदवीधर मतदारसंघ आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले डॉ. विजय मकासरे यांनी दोन वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. मकासरे यांचा पदवीधर मतदार संघामध्ये मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्यांचा निश्चितच फायदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळणार असल्याने यंदाची निवडणूक विद्यमान आमदार असलेले डॉ. सुधीर तांबे यांना जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी कडून नाशिक पदवीधर निवडणूक मोठ्या ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती विजय मकासरे यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याशी तासभर चाललेल्या बैठकीत डॉ.मॅक त्रिभुवन यांच्या उमेदवारी बाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या काही दिवसातच पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारी बाबत मागणी करणार आहोत अशी माहिती यावेळी मकासरे यांनी माध्यमांना दिली. पक्षाने उमेदवारी दिल्यास अहमदनगर जिल्हा निरीक्षक सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा भास्कर, जिल्हा महासचिव अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार असल्याचे डॉ मॅक त्रिभुवन यांनी सांगितले.