कृषी

शाश्वत व सुरक्षीत अन्न उपलब्ध होणे ही आजची गरज- अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. योगेश देशमुख

राहुरी कृषि विद्यापीठामध्ये जागतिक अन्न दिवस साजरा

राहुरी विद्यापीठ : आपण जे अन्न खातो हे परिपुर्ण असले पाहिजे. आपल्या आहारात फळे व भाजीपाल्याचे प्रमाण हे जास्त असायला हवे व चरबीयुक्त पदार्थ, तेल, साखर व मीठ याचे प्रमाण हे नगण्य असले तरच तो आहार हा परिपुर्ण मानला जाईल. सर्वांना पुरेसे पोषणतत्व असलेले शाश्वत व सुरक्षीत अन्न उपलब्ध होणे ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली अंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिवसानिमित्त दैनंदिन जीवनातील अन्न व पोषणाची भूमिका या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते डॉ. योगेश देशमुख मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण, कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
डॉ. देशमुख आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, जगामध्ये भुकेची समस्या फार मोठी असून 16 ऑक्टोबर, 1945 रोजी स्थापन झालेल्या अन्न कृषि संस्थेच्या कार्यामुळे संपूर्ण जगात भुकेच्या समस्येवर प्रयत्न केले जात आहे. 16 ऑक्टोबरला साजर्या होणार्या जागतीक अन्न दिवसाची यावर्षीची थीम आहे अन्नासाठी कोणीही पाठीमागे राहु नये. या अंतर्गत सन 2030 पर्यंत पुरेसे व पौष्टीक अन्न सर्वांना मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अन्नदुतांना टी शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद रसाळ व डॉ. दिलीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांनी तर सहसंयोजक म्हणून कास्ट प्रकल्पाचे सह संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आयोजन सचिव म्हणून अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी तर सह आयोजन सचिव कृषि विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास सुर्वे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. मुकुंद शिंदे यांनी करून दिली. या कार्यक्रमाचा उद्देश डॉ. उत्तम चव्हाण यांनी विषद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले. डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. वैभव मालुंजकर व इंजि.मोहसीन तांबोळी यांनी या कार्यक्रमाचे सह समन्वयक म्हणून काम पाहिले.

Related Articles

Back to top button