अहिल्यानगर
पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी आग्रही राहणार – आ. तनपुरे, अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी
राहुरी | बाळकृष्ण भोसले – परतीच्या पावसाने राहुरी तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. अचानकपणे आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी वर्ग पूर्णपणे हताश झाला. या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज शनिवारी दौरा केला.
या दौऱ्यात अत्यंत विदारक चित्र पहावे लागले. गुहा, तांभेरे, चिंचविहिरे, कनगर, वडनेर, गणेगाव, म्हैसगाव व कोळ्याची वाडी या भागात आमदार तनपुरे यांनी दौरा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अत्यंत पोट तिडकीने आपल्या व्यथा मांडल्या. त्या सर्व व्यथा ऐकून तनपुरे भावुक झाले. जलयुक्त शिवारातील तलाव फुटल्याने मुख्य दळणवळणाचे रस्ते वाहून गेले. ये जा करण्यासाठीचे सर्व रस्ते बंद पडले. त्यामुळे दैनंदिन जीवनात मोठा अडथळा आला. दूध संकलन केंद्रामध्ये दूध घालणेही मुश्किल बनले. शेतातील सडून गेलेली पिके पाहून शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देतांना त्यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित न राहता त्यास मदत कशी देता येईल यासाठी मंत्रालय दरबारी कोणताही कसूर ठेवणार नाही. सोयाबीन कपाशी ऊस या पिकांचे पंचनामे झाले मात्र उशिराच्या झालेल्या पावसाने वाचलेली शेती पिकेही पूर्णपणे संकटात सापडली व नष्ट झाली. त्या पिकांचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. शासनाचा नियमात घास, चारा पिके यांचा समावेश नाही असे त्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या पिकांचेही पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याने कांदा सडून गेला. या चाळींचेही पंचनामेचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. पावसाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते परंतु नंतरच्या पावसाने थैमान घातल्याने गावागावातील सर्वच शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली. काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या तर जमीन खराडण्याच्या ही घटना घडल्या. जलयुक्त शिवार योजनेतील तलाव फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात पाणी घुसले. काही घरांची पडझड झाली. घरातील साहित्य वाहून गेले. जनावरे वाहून गेली यासह अनेक घटना घडल्या. विहीर बुजून जाण्याचे प्रकारही घडले. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला होता परंतु जाचक निकषामुळे नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी मिळाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर अनुभव वाईट असल्याने आम्ही पिक विमा उतरविला नाही असे शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई तरी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असा शब्द त्यांनी हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिला. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नायब तहसीलदार संध्या दळवी, गावातील कृषी सहाय्यक, कामगार तलाठी या दौऱ्यात सहभागी झाले होते. येणाऱ्या अडीअडचणींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तहसीलदार एफ एम शेख यांनाही दूरध्वनी करून परिस्थितीची जागेवरच जाणीव करून दिली. संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन येणाऱ्या अडचणी सोडविल्या.
राहुरी तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिके फळबागा पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडला. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याने अनेक ठिकाणी सणही साजरा होण्यासाठी परिस्थिती राहिलेली नव्हती. ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील परिस्थिती अधिकच भीषण होती. आमदार तनपुरे यांनी अतिवृष्टी नंतरचा केलेला दौरा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असल्याचे गावागावातील नागरिकांनी सांगितले.