अहिल्यानगर
पेमगिरीतील शहागडावर दिपोत्सव सोहळा संपन्न
बाळासाहेब भोर | संगमनेर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील शहागडावर मोठ्या उत्साहात दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शंभूराजे परिवार, वेड इतिहासाचे या टीममधील मावळ्यांनी हातात मशाल घेत शीतलामाता मंदिरापासून हर हर महादेवच्या गर्जना करत गडावर पोहोचले. यावेळी छत्रपतींच्या जयघोषात काही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकही पार पडले. याची देही याची डोळा बघावा असा नेत्रदीपक रींगन सोहळा यावेळी शहागडावर पार पडला व असंख्य मशाली व दिव्यांनी संपूर्ण गड उजळून निघाला होता.
बेळगांव, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, संगमनेर अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मावळ्यांनी यावेळी गडावर साफसफाई करून आवश्यक त्या ठिकाणी कचराकुंडी बसविल्या आहेत. तसेच शहागडाचा जो इतिहास आहे, तो इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी विविध लिखित स्वरूपातील फलक उभे केले आहेत. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकोट संवर्धन तसेच छत्रपतींचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार, वेड इतिहासाचे या संपूर्ण परिवाराची एक आगळी वेगळी ओळख आहे. दीपोत्सवानंतर सर्व मावळ्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे, रावसाहेब काका डुबे, खंडू जेडगुले, विष्णु डुबे, राजेंद्र जाधव, सदा भोर, जनार्धन कोल्हे, संदीप डुबे, भास्कर डुबे, विजय कोल्हे, लहानू गोडसे, दीपक शेटे, भीमा पांढरे, स्वप्नील कोल्हे, सतीश कोल्हे, राजू परदेशी, प्रवीण गुळवे, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिकेत शिंदे तसेच परिसरातील नागरिक खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.