शिक्षणवारी ज्ञान पंढरी

जीवनामध्ये चांगले नागरिक बना ज्याचा महाविद्यालयाला व देशाला गर्व वाटेल – सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे

राहुरी विद्यापीठ : जगामध्ये महात्मा गांधींना आपले गुरू मानणारे अनेक लोक सापडतील. आफ्रिकेसारख्या देशामध्ये महात्मा गांधीजीचे बरेच शिष्य आपणाला पहावयास मिळतात. महात्मा गांधींनी भारताला सत्य व अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या शिक्षकांसारखे वागा असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे आजादी के अमृतमहोत्सवअंतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. अहिरे बोलत होते. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठातील अधिष्ठाता कार्यालयाचे सहाय्यक कुलसचिव एकनाथ बांगर उपस्थित होते. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतात. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या चुका लवकर कळतात असे विद्यार्थी जीवनात चांगले यशस्वी होतात. आपल्या शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये मिळालेल्या ज्ञानावर जीवनामध्ये यशस्वी बनावे व महाविद्यालयातील शिक्षकांच्या सतत संपर्कात राहावे, ज्यामुळे शिक्षकांना व महाविद्यालयाला आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटेल.
यावेळी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी गोविंद भराड व कुमारी प्रज्ञा घुले यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या प्रज्ञा घुले हिने केले तर उपस्थितांचे आभार कृषिकन्या समीक्षा आव्हाळे हिने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, विशाल भोसले, सौ. ज्योती सासवडे व सौ. विद्या पुजारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button