महायुतीचे सरकार आल्यावर मंत्री म्हणून जनतेचे प्रश्न वेगाने सोडवणार : शिवाजीराव कर्डिले यांचा विश्वास
राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये कर्डिलेंचा प्रचार दौरा, गावनिहाय विकास कामांची यादीच सादर

राहुरी | अक्षय करपे : राहुरी विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील पाच वर्षे आमदार नसतानाही विकासकामे काय असतात हे राहुरीकरांना दाखवून दिले आहे. दररोजच्या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. शेतकऱ्यांची वीजबिले माफ करीत आता मोफत वीज देण्याचे काम सरकारने केले आहे. महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू करून गरीब कुटुंबाला संकट काळामध्ये आर्थिक मदत करण्याचे काम केले आहे. भाजप महायुती सरकारमुळे आता सर्वांचीच दिवाळी मोठ्या उत्साहात आनंदात साजरी होणार आहे. आता भविष्यकाराकडे जायची गरज नसून माझा विजय निश्चित असून महिलांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार येणार आहे आणि मी मंत्री होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यास गती देईल. मंत्री कसा असावा याचा आदर्श दाखवून देईल, असा विश्वास माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.
राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी रविवारी तालुक्यातील गणेगाव, गुहा, तांभेरे, तांदूळनेर, सात्रळ, माळेवाडी, डुक्रेवाडी, सोनगाव, अनापवाडी, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव, वडनेर, कणगर, चिंचविहिरे आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
या प्रचार दौऱ्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उपजिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, अमोल भनगडे, सतीश कोबरने, साईनाथ कोळसे, बबन कोळसे, राजेंद्र कोळसे, गंगाधर कोबरने, कैलास कोबरने, शरद बोठे, विजय शेवाळे, महेश शिरसाठ, बाळासाहेब मुसमाडे , एन.पी. गागरे, उद्धव मुसमाडे, सुनीताताई मुसमाडे, उत्तम मुसमाडे, विलास मुसमाडे, जयवंत साबळे, रमेश साबळे, गणपत सरोदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
कर्डिले यांनी प्रत्येक गावात केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली जात होती. लोकप्रतिनिधी असताना गावनिहाय विकासकामे करण्यावर भर दिला. गावांमध्ये अनेक चांगले बदल झाले. त्यामुळे आता कुठल्याही भूलथापांना व भावनिक मुद्द्याला बळी न पडता त्यांनी केलेल्या कामाची दखल ग्रामस्थांनी घ्यावी असे आव्हान यावेळी करण्यात येत होते. तनपुरे कुटुंबियांनी नेहमीच स्वतःचे हित पाहिले. सर्वसामान्यांना कधीच त्यांचा हक्क मिळवून दिला नाही. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था संपविण्याचे काम त्यांनी केले. मंत्रीपदी असताना सहा खाते होती. तरीही मतदार संघातील प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. जनतेच्या पदरी निराशाच पडली. हे चित्र बदलण्यासाठी यावेळी परिवर्तन आवश्यक असल्याच्या भावना प्रचारादरम्यान व्यक्त करण्यात आल्या.
कर्डिले यांच्या विकासकामांमुळे गणेगाव बनले आदर्श गाव
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील गणेगावच्या विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. परिणामी आज या गावचा सर्वांगीण विकास झाला आहे. गावाचा कायापालट झाला असून राज्यात आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळाला आहे.