अहिल्यानगर
पवित्र मरीयेव्दारे आपले जीवन समर्पित करावे-फा.डॉमनिक ब्राम्हणे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पवित्र मरीयेव्दारे आपले जीवन समर्पित करावे असे प्रतिपादन दि ७ सप्टेंबर रोजी हरिगाव मतमाउली यात्रापूर्व सातवे नोव्हेनाचे पुष्प गुंफताना घोडेगाव येथील धर्मगुरू व प्राचार्य फा.डॉमनिक ब्राम्हणे यांनी “पवित्र मरीयेचे पृथ्वीवरील प्रकटीकरणाव्दारे मिळालेला संदेश” या विषयावर प्रवचन करताना केले.
त्यांनी सांगितले की पवित्र मारिया ही परमेश्वराच्या स्वप्नातील सुंदरी होती. ती आमची सदैव मध्यस्थी करणारी माता होती. तिने निरनिराळ्या ठिकाणी विविध हेतूसाठी पवित्र मरीयेने दर्शन देऊन परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचा व पापाचे उच्चाटन करण्याचा संदेश दिला. त्या दर्शनापैकी काही दर्शने अधिकृतपणे मान्य केलेले आहे. त्यात १५३१ मध्ये ग्वादालुपे, मेक्सिको जान डायगोच्या झऱ्यावर“जीवन देणाऱ्या प्रभूची खरी माता”म्हणून दर्शन दिले, १८४६ ला सालेट फ्रान्स येथे पापनिवारणासाठी पाचारण झाले त्यावेळी, १८५८ या वर्षी लूरडस, फ्रान्स येथे बर्नाडेटला दर्शन व प्रायश्चित करून देवाकडे परतण्यासाठी पाचारण, १९१७ फातिमा, पोर्तुगाल या ठिकाणी दर्शन दिल्याचे मान्य करण्यात आले. आम्ही देखील आपल्या पापांचा स्वीकार करून परमेश्वराला पवित्र मरीयेव्दारे आपले जीवन समर्पित करावे…
या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी होते. डोंगरासमोर अचानक मुसळधार पावसाचा वर्षाव झाल्याने उर्वरित मिस्सा अर्पण आदी कार्यक्रम चर्चमध्ये घेण्यात आले. दि ८ सप्टेंबर रोजी पेपल सेमिनरी रेक्टर पुणे रे फा भाऊसाहेब संसारे यांचे सिनड २०२२-२३ ख्रिस्त सभेच्या सहवासात प.मरीयेची सहभागीता”या विषयावर प्रवचन होणार आहे. तरी भाविकांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी, हरिगाव उन्दिरगाव ग्रामस्थ आदींनी केले आहे.