अहिल्यानगर
गरीब, दुःखी दलितांचे आश्रू पुसण्याचे कार्य करावे – आ. निलेश लंके
टाकळीभान : कोरोना काळातील अनाथ निराधार मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना आ. निलेश लंके, समवेत पद्मश्री राहीबाई पोपेरे, सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत आदी…
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : गरीब दुःखीत दीन दलितांचे अश्रू पुसण्याचे काम माणसाने करावे. त्यातच परमेश्वर असून स्वतःसाठी जगलात तर माती होते व दुसऱ्यासाठी जगलात तर आयुष्याचे सोने होते असे प्रतिपादन टाकळीभान येथे कोरोना काळातील अनाथ निराधार मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके यांनी केले.
यावेळी 75 च्या वर कोरोना काळातील अनाथ निराधार मुलांना शालेय वस्तू वाटप व गरजवंत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुक्यातून व तालुक्यात बाहेरील निराधार मुले, बालके व जनसमुदाय उपस्थित होता. महाराष्ट्रातील कोरोना काळातील कार्यसम्राट कोरोना योद्धा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते वस्तू वाटपाचा कार्यक्रम झाल्याने दुर्ध शर्करा योग आला. कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे आ. लंके व त्यांच्या हस्ते कोरोना काळातील अनाथ मुलांना वस्तू वाटप झाल्याने उपस्थित सर्वजण सुखावले. या कार्यक्रमामुळे कोरोना -लंके व मदत ही संकल्पना पुन्हा एकदा सर्वांसमोर पुढे आली.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके, पद्मश्री रहीबाई पोपरे, सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, अशोक नाना कानडे, शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते अनाथ, निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक खर्च वाटप व शालेय उपयुक्त वस्तू बॅगचे वाटप करण्यात आले. या अनाथ गरजू मुलांना मदत झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. याप्रसंगी आमदार निलेशजी लंके यांच्या सुंदर वक्तृत्व व कोरोना काळातील सांगितलेल्या अनुभवांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच आमदार लंके यांनी ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने कोरोना काळातील अनाथ निराधार मुलांना शालेय उपयुक्त वस्तू वाटप या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यावेळी बोलताना आमदार लंके यांनी तरुण युवकांना सल्ला दिला की, हारतुरे यावर खर्च करण्यापेक्षा गरजवंत मुलांना वह्या वाटप, चप्पल वाटप, गणवेश वाटप करा. निश्चितच तुम्हाला समाधान वाटेल. तसेच माणसांनी दुसऱ्यासाठी जगावे, स्वतःसाठी तर सर्वच जगतात, स्वार्थी माणूस मोठा होत नाही, जो दुसऱ्यासाठी जगतो तोच मोठा होतो. ज्ञानज्योती संस्थेने समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे चांगले काम करत असे ते म्हणाले. तर सभापती वंदनाताई मुरकुटे, अशोक नाना कानडे यांनी ज्ञानज्योती संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव टेमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अविस्मरणीय विलक्षण असा कार्यक्रम यावेळी सर्वांच्या सहकार्याने पार पडला.
शालेय उपयुक्त वस्तू वाटपानंतर विविध क्षेत्रातील कला, क्रीडा साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, वैद्यकीय, शासकीय सेवा, कृषी, आदर्श सरपंच, उपसरपंच क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच चार राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय व चार उत्कृष्ट स्वच्छ सुंदर जिल्हा परिषद शाळा यांना पुरस्कार देण्यात आले. ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने कार्यक्रम प्रसंगी सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा.कार्लस साठे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, श्रीप्रतिष्ठान अहमदनगरचे अध्यक्ष गणेश आनंदकर, ग्रामीण कवी पोपटराव पटारे, कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शेख, ह.भ. प. दत्तात्रय बहिरट महाराज, प्राचार्य जयकर मगर, प्रा. विजय बोर्डे, जल परिषदेचे सदस्य भिला सोनु पाटील आदीसह मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी निराधार महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद हापसे, बबलू वाघुले, अक्षय कोकणे, ऋषीराज हापसे, सागर पवार, संदीप पटारे, दिगंबर मगर, सुजित बोडखे, रामेश्वर शिंदे, महेश शिंदे , झिंजुर्डे सर, माकोणे सर, बापूसाहेब साळवे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व संगीता फासाटे यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी मानले.