साहित्य व संस्कृती
डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे ‘अवतीभवती’ पुस्तक ज्ञानवर्धक – प्रकाश कुलथे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेले ‘अवतीभवती’ हे पुस्तक ज्ञानवर्धक असून या लेखसंग्रहातून अनेक विषयांचे अनुभवचिंतन व्यक्त झाले असल्याचे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान वाचनालयात डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या ‘अवतीभवती ‘ या विविध ज्ञानविषय असलेल्या पुस्तकाचे स्वागतपर मनोगतात पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून पुस्तकाचे महत्व आणि त्यातील विषयांचे विवेचन केले.पत्रकार प्रकाश कुलथे पुढे म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या अवतीभवती जे जे पाहिले, उपक्रम केले, विविध प्रसंगी ज्या सामाजिक, वाड्मयीन जाणिवा झाल्या, त्यावर आधारित असणारे हे पुस्तक वाचकाला आनंद देणारे आहे, ते वाचकांनी जरूर वाचावे, असे आवाहन केले.
संगीता फासाटे या पुस्तकाविषयी म्हणाल्या, प्रकाशिका सौ.स्नेहलता कुलथे यांच्या स्नेहप्रकाश प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक अंतर्बाह्य सुंदर आहे, आकर्षक मुखपृष्ठ आणि सुबक मांडणीमुळे हे पुस्तक मनाला भावणारे आहे. मराठीतील साक्षेपी समीक्षक डॉ. शिवाजी काळे यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाचे अचूक मूल्यमापन करणारी आहे. मलपृष्ठावर प्रा. कवी पोपटराव पटारे यांचा मनस्वी अभिप्राय चिंतनीय आहे. मित्रवर्य पोपटराव पटारे, डॉ. शिवाजी काळे, पत्रकार प्रकाश कुलथे आणि डॉ. रामकृष्ण जगताप यांना अर्पण केलेले हे पुस्तक स्वागतशील आहे. प्रत्येकाला आवडणारे आणि आपल्या अवतीभवतीच्या ज्ञानजाणिवेचे पुस्तक सर्वांना उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी निर्मिक उपाध्ये, आराध्या सैंदोरे, गणेशानंद उपाध्ये उपस्थित होते. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.