कृषी

आंबेबहार मोसंबी फळगळीवर तात्काळ उपयोजना हाती घ्याव्यात

विलास लाटे | पैठण : तालुक्यात मागील महिनाभरातील पावसाने विविध ठिकाणी आंबेबहार मोसंबीमध्ये फळगळीची समस्या उद्भवली असून शेतकऱ्यांनी उपायोजना करण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी पैठण यांच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत तालुक्यातील वडवाळी, शृंगारवाडी, आनंदपुर, पैठण आखातवाडा, ढोरकीन व धनगाव यागावांमध्ये तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे व कृषी पर्यवेक्षक किशोर पाडळे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोसंबी पडगळविषयक उपायोजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करतेवेळी मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे यांनी काही उपाययोजना शेतकऱ्यांनी हाती घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने १) मोसंबी बागेत पावसाचे पाणी साचून राहू देऊ नये व चर काढावेत. २) सध्या सततच्या पावसामुळे अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली असून झाडांमध्ये संप्रेरकांची निर्मिती थांबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ नॅनो युरिया ३० मिली + प्लेनोफिक्स (एनएए) ३ मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. ३) यानंतर १० ते १५ दिवसाच्या अंतराने बुरशीजन्य रोगांसाठी (रिडोमिल गोल्ड) मेटलेक्झिल + मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २५ ग्रॅम + रसशोषण करणाऱ्या किडीकरिता रोगर १५ मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे. ४) बागेतील वासनवेल व गुळवेली नष्ट कराव्यात. अथवा फवारण्या करुण घ्याव्यात. असे मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी सहाय्यक सचिन खरात, बी. जे. साबळे, बी. जे. नजन, एस. बी. अकोलकर, चंद्रकांत कुसळकर तसेच पत्रकार दत्तात्रय मुळे, बंडू थोरात, भगवान मुळे, नवनाथ नरवडे, सतिश मुळे, भगवान नरवडे, राहुल थोरात, राजू भडके, अशोक पठाडे, गणेश थोरात, गणेश मुळे, शुभम थोरात व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button