अहिल्यानगर
जैविक इंधननिर्मितीच्या बाबतीत भारताला स्वावलंबी, सुरक्षित बनविणे गरजेचे – डॉ. बबनराव आदिक
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माती, पर्यावरण आणि सर्व जीवन विषारी करून टाकले आहे, या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी जैविक इंधननिर्मिती ही काळाची अत्यावश्यक गरज झाली असून भारताला आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी भारताला यादृष्टीने स्वावलंबी, सुरक्षित बनविणे गरजेचे असल्याचे मत अर्थतज्ञ डॉ. बबनराव आदिक यांनी व्यक्त केले.
येथील एमसीएल अंतर्गत जीतशार प्रोड्युसर कंपनी लिमिटेडतर्फे शासकीय विश्राम गृहामध्ये जागतिक जैविक इंधन दिनानिमित्त ग्राम उद्दोजक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.बबनराव आदिक बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ, अभ्यासक बेबी कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. संयोजक संदीप दातीर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार केले. श्रीगणेश आणि भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.बबनराव आदिक यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ.श्यामजी घोलप, रंजित दातीर यांच्या स्वप्नातील प्रदूषणमुक्त, आरोग्यशील, स्वावलंबी इंधननिर्मिती, समर्थ शेतकरी यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. यावेळी त्यांनी ‘जैविक इंधन डे इतिहास’ सांगितला. त्यानुसार जीतशार प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची उभारणी ऑगस्ट -सप्टेंबर 2022 पर्यंत खानापूरला करण्याचा मानस आहे, असे सांगून डॉ. आदिक यांनी जागतिक पर्यावरण, जगाचे भवितव्य यांचा विस्तृत आढावा घेतला.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्रारंभी ‘ कष्ट आणि शेतकरी ‘ या संदर्भाने कविता सादर करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, ना. नितीन गडकरी इत्यादींनी जैविक इंधन निर्मिती बाबतीचे विचार, कार्य हे प्रेरणादायी आहे. या बाबतीत भारत स्वावलंबी झाला तर जगात आपला देश महान होईल. या दृष्टीने रंजित दातीर यांनी हाती घेतलेल्या कार्यास हातभार लावले पाहिजेत अशी अपेक्षा डॉ.उपाध्ये यांनी व्यक्त केली. प्रा.शिवाजीराव बारगळ, बेबी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून सांगितले की, श्रीरामपूर तालुक्याला वरदान ठरणारा खानापूर येथील जैविक इंधन निर्मिती करणारा कारखाना लवकर सुरु व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र येळवंडे, विष्णू भगत, धनंजय काळे, संदीप दातीर यांनी नियोजनात भाग घेतला. तालुक्यातील ग्रामो उद्दोजक यावेळी उपस्थित होते, सूत्रसंचालन करून बाबासाहेब पटारे यांनी आभार मानले.