परमेश्वरावर विश्वास ठेवा, आई म्हणून मतमाउलीचा सन्मान करा — फा. सहायराज

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) — हरिगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे यात्रापूर्व भक्तीचा दुसरा शनिवार नोव्हेना आज भक्तिभावाने आणि अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.
नोव्हेनाची सुरुवात संत तेरेजा चर्च प्रांगणातून मतमाउलीच्या भव्य मिरवणुकीने झाली. पावसाच्या गारव्याने वातावरण प्रसन्न झाले होते.
या प्रसंगी फा. सहायराज (संत फ्रान्सिस चर्च, मनमाड) यांनी पवित्र मरिया रोग्यांच्या आरोग्या या विषयावर प्रवचन केले. त्यांनी सांगितले की, “पवित्र मरिया ही आपली आई आहे, जी आपल्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करते. ती फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यही प्रदान करते.” फा. सहायराज यांनी पुढे सांगितले की, भाविकांनी परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवणे, आई म्हणून मतमाउलीचा सन्मान करणे व परमेश्वराचे वचन ऐकून तसे वागणे, या तीन गोष्टी लक्षात ठेवावे.
बायबलमधील वचनांचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, “प्रभू म्हणतो, जर तू माझे वचन मनापासून ऐकशील, नीट व चांगले वागशील आणि माझ्या नियमांचे पालन करशील, तर मी तुला रोगमुक्त ठेवीन. कारण मी तुझा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.”
या पवित्र नोव्हेनात संत फ्रान्सिस चर्च, मनमाड; होली फॅमिली चर्च, कोपरगाव; रोझरी चर्च, कोळपेवाडी येथील फा. सतीश कदम, फा. विशाल त्रिभुवन, फा. संजय पठारे, फा. विवेक, फा. दोनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रिग्ज तसेच विविध धर्मभगिनी व शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
येत्या १९ जुलै रोजी ‘पवित्र मरिया पाप्यांच्या आश्रया’ या विषयावर प्रवचन होणार असून, त्यावेळी डॉन बास्को चर्च (सावेडी), संत जॉन चर्च (भिंगार), संत अन्ना चर्च (अहिल्यानगर) येथील धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.