महाराष्ट्र
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची क्रांतीसेनेची मनपा कडे मागणी
परभणी : शहरात सर्वत्र प्लास्टिक दिसत असल्याने प्लास्टिक बंदी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त देविदास पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्यात प्लास्टिक बंदी कायदा लागु असताना परभणी शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू आहे.परभणी शहरातील छोटे-मोठे व्यापारी सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.तसेच या प्लास्टिकमुळे जनावरांनाही हानी होत आहे.यामुळे प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी कराण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्यावतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील,परभणी जिल्हा अध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील, महेश तिवारी,स्वप्निल गरुड,आशिष राऊत, दत्तात्रय सावंत,शाम चापके, शिवाजी तोलमारे,ज्ञानेश्वर इक्कर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.