अहिल्यानगर
महात्मा फुले कृषि विद्यापीठात नामांकित कंपनीचे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट विषयीचे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली स्थित टर्मिनिक्सीस सीस इंडीया या कंपनीद्वारे आयोजीत केलेल्या या शिबीरासाठी महाविद्यालयातील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा व मुलाखतीतून अंतीम निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रिया दोन दिवसात पार पडणार असल्याचे कंपनीच्या वतीने वरिष्ठ अधिकारी एच.आर. मॅनेजर पंकज सिंन्हा व सहाय्यक व्यवस्थापक मुकुंद मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. बी.बी. ढाकरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. व्ही.एस. पाटील व तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्लेसमेंट अधिकारी डॉ. भरत भालेराव यांनी केले.