राजकीय
बारागाव नांदुर गटातून उपसभापती प्रदिप पवार यांना मिळणार संधी ?
राहुरी / बाळकृष्ण भोसले – ग्रामीण भागातील मिनी आमदारकी संबोधल्या जाणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची आरक्षण सोडत अखेर हो ना करता करता जाहीर झाली.
आपल्या खात्यात जागा येवून तसं आरक्षण मिळावे म्हणून अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले होते. मात्र काहींच्या पथ्यावर तर काहींच्या विरोधात आरक्षण निकाल गेल्याने काहींना आनंद तर काही हिरमुसले गेले. काही ठिकाणी पुरूष गुडघ्याला बाशिंग बांधून होते. तेथे महिलांसाठी आरक्षण पडले तर काही ठिकाणी महिला राखीव जागा व्हावी तेथे पुरूष आरक्षण झाले. त्यामुळे काही दिग्गजांना हात चोळत बसण्याची वेळ आली.
मागील पंचवार्षिक निवडणूकीत राहुरी खुर्द गणात अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले व तेथे प्रदीप पवार यांना संधी मिळाली. इमानी इतबारे पक्ष संघटनेचे त्यांनी काम केल्याने मंञी तनपुरेंनी त्यांना प्रमोशन देत पंचायत समितीच्या उपसभापती पदाची संधी देत आणखी त्यांच्या पंखांना बळ दिले. त्या संधीचा सुयोग्य वापर करत श्री पवार यांनी शासकीय योजनांचे जाळेच मतदार संघात पोहोचते केले म्हणून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. आदिवासी व दलित बहुल वाड्यावस्त्यांवर त्यांच्या काळात झालेल्या शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासकामांचा चढता आलेख नक्कीच उल्लेखनीय असाच राहिला असल्याने तसेच या गटाचे प्रतिनिधित्व करणारे व नेहमीच जनसामान्यांचा आधारवड म्हणून सर्वपरिचित असलेले दिवंगत शिवाजीराजे गाडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत जनमाणसाशी नाळ जोडून ठेवण्यात यशस्वी झालेले पवार हे सामाजिक कामांत नेहमीच अग्रेसर राहिल्याने पक्षश्रेष्ठींच्या मनातही अल्पावधीत घर केले आहे. त्यामुळे पवार यांना त्यांच्या कामाचा फायदा जनसामान्यांपर्य॔त पोहोचण्यासाठी नक्कीच झाला.
या आरक्षण सोडतीत माञ बारागाव नांदुर गटच अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने या गटातून तळागाळातील आदिवासी, दलित, व अन्य सर्वांशीच सख्य व स्नेहबंधाचे नाते असलेल्या प्रदिप पवार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे. तशी संधी मिळाल्यास राष्ट्रवादीची ही जागा हक्काची होत पवार यांचा गतकाळातील जनसंपर्क व पक्षश्रेष्ठींप्रती असलेली निष्ठा याचा ताळमेळ घालून जागा मिळविण्याची नामी संधी आहे, यात शंका नाही.