अहिल्यानगर
सरपंच डॉ. घिगे यांनी समाजमाध्यमांवरील समस्येची दखल घेत हातात फावडे घेऊन रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी
राहुरी/ बाळकृष्ण भोसले – तालुक्यातील म्हैसगाव महसूल गावापासून कोळेवाडी महसूल गाव हे अलिप्त होऊन ५० ते ५५ वर्षे झाली आहेत. म्हैसगाव हद्दीतील केदारबाबा ते कोळेवाडी गावातील हद्द आंबेकरवस्ती (मरभळवाडी) म्हैसगाव व कोळेवाडी या दोन गावातील ग्रामपंचायत स्थापन होऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरी केदारबाबा ते आंबेकरवस्ती या दोन गावांच्या हद्दीतील रस्त्याचा प्रश्न अजूनही ऐरणीवर होता.
दोन्ही गावातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी यांनी तालुक्याची मोठी पदे भूषविली. त्यांना या जनतेची आठवण फक्त निवडणुका जाहीर झाल्यावरच येते, कोळेवाडीतील ग्रामपंचायत ही सध्या राहुरी तालुक्यात कृतीशील आणि परिवर्तनात्मक जबाबदारी घेऊन प्रत्यक्ष काम करत आहे. दिनांक १० जुलै रोजी कोळेवाडी व म्हैसगाव या दोन गावातील व्हाट्सअप ग्रुपवर शिकलेल्या जानकार व्यक्तींनी या रस्त्याचे दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली होती. स्वतः कोळेवाडीचे सरपंच डॉ. जालिंदर घिगे यांनी ग्रुपवरील समस्याची तात्काळ दखल घेऊन ११ जुलै २२ रोजी कोळेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत भर पावसामध्ये स्वतः हातात फावडे घेऊन रस्त्यावर टाकलेला मुरूम पसरविण्याचे काम केले.
सध्या पावसाळा सुरू आहे. शाळेतील मुले व तसेच शेतकऱ्यांची वर्दळ नेहमी या रस्त्याला असते. या सर्वांची दळणवळण व वाहतूकीची सोय तात्काळ केल्याने दोन्ही गावातील जनतेमध्ये कोळेवाडी ग्रामपंचायत व सरपंचांबद्दल आपुलकीची भावना व्यक्त केली जात आहे. काळेवाडीचे सरपंच डॉ.घिगे कृतीतून रस्त्यावर उतरून काम करतात हे राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील गावकारभारी यांनी समजुन घेऊन यासारखे काम पश्चिम भागातील ग्रामपंचायतीने केले तर या भागातील जनतेचे मूलभूत प्रश्न नक्कीच सुटले जातील अशी अपेक्षा या भागातील सर्व जनतेतून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील दळणवळणासाठी रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. या समस्यांवर आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या गावपुढार्यांनी योग्य भूमिका घेऊन काम केले नाही, म्हणून सध्या पश्चिम भागाला दिशा देण्यासाठी कोळेवाडी गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कृतीतून काम सिद्ध करत आहेत. तरी वर्तमानकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने गांभीर्याने विचार करून कृतिशील काम करत असलेल्या तरुण तडफदार उमेदवारांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची अपेक्षा जनतेकडे आम्ही करत आहोत._ संदीप कोकाटे, राहुरी तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी