राजकीय
राहुरी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्यांच्या १६ जागांच्या पोटनिवडणुका लवकरच
निवडणूक आयोगाने केला मतदार यादी अंतिम कार्यक्रम जाहीर…
राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणामुळे रिक्त झालेल्या १३ गावांमधील १६ ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुका लवकरच पार पडणार असून निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राहुरी तालुक्यात निधन, राजीनामा, अनर्हता, किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून सदर ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे सदर ठिकाणी पोटनिवडणुक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सदर ठिकाणी मतदार यादी अंतिम करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव – २ (अनु.जाती, अनु.जमाती), धामोरी खुर्द – १ (अनु. जमाती), मुसळवाडी – २ (अनु. जाती स्त्री, अनु. जमाती), पिंप्री वळण – १ (अनु. जमाती महिला), आरडगाव – १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ब्राम्हणगाव भांड – १ ( अनु. जमाती स्त्री), मोमीन आखाडा – २ (सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री), पिंपळगाव फुणगी – १ (सर्वसाधारण), चिंचोली – १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), राहुरी खुर्द – १ (सर्वसाधारण स्त्री), शेरी चिखलठाण – १ (अनु.जमाती), ताहाराबाद – १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), तांदुळनेर – १ (सर्वसाधारण) आदी १३ गावांमध्ये १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आली आहे. तर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.१२ ते १६ नोव्हेंबर २०२१ असा असून दि. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रा.पं. रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील सुमारे ७६ सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आगामी काळात जाहीर होणार आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व डॉ. तनपुरे साखर कारखाना आदी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.