अहिल्यानगर
राहुरी नगरपालिकेस प्राप्त विविध निधीतुन विकास कामाचा शुभारंभ
अहमदनगर/ जावेद शेख : नगरपालिका निवडणुकीत मागील 5 वर्षांपूर्वी जाहीरनाम्यात जी जी आश्वासने दिली होती ती जवळपास पूर्ण केली असून शहरातील नागरिकांना चांगली सेवा देण्याचे दृष्टीने भूमिगत गटार योजना लवकरच हाती घेण्यात येणार असून त्याकामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यासाठी निधीही उपलब्ध होताच सदर योजनेचे काम सुरु होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी दिली.
राहुरी नगरपालिकेच्या वतीने आज डावखर खळवाडी स्टेशन रोड येथे नगरपालिकेस प्राप्त झालेल्या विविध निधीतून हाती घेतलेल्या विकास कामांचे शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल कासार होते. यावेळी मधुकर भुजाडी, एकनाथ डावखर, शिवाजी डावखर, रावसाहेब भुजाडी, भीमाशंकर डावखर, बाळासाहेब भुजाडी, बाळासाहेब शेटे, नरेंद्र शिंदे, गणपत डावखर, नगरसेवक सोन्याबापू जगधने आदि प्रमुखांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. तनपुरे ह्यांनी मागील नगरपालिका निवडणुकीत जनतेला जी जी आश्वासाने दिली होती. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली असून मी आमदार मंत्री होण्यापूर्वी 3 वर्ष या शहराचा नगराध्यक्ष होतो. या तीन वर्षाचे काळात राज्यात पक्षाची सत्ता नव्हती. आमदार विरोधी पक्षाचा असल्याने विकास कामांसाठी सरकारकडून एक रुपयाही निधी मिळत नव्हता. पण केवळ राहुरी नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असल्याने पालिकेने शहरात अनेक विकासाची कामे केली. नंतर शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी मला विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून दिले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी मला राज्यात आपल्या विचाराचे सरकार सत्तेवर आल्याने मंत्री केले. नगरविकास खाते माझ्याकडे आले. शहरातील अनेक प्रलंबीत प्रश्नांना हात घालून अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शहरातील नागरिकांना चांगले स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी 28 कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली असून सदर योजनेचे काम आज प्रत्यक्षात सुरु झाले आहे.
शहरात सौर ऊर्जेवर चालणारे हायमॅक्स बसविले, बंदिस्त गटारीची कामे केल्याने शहरात आज डासांची समस्या कमी झाली आहे. पालिकेत आज सत्ता आमची असली तरी विरोधक चांगल्या विकास कामांना आम्हाला नेहमी सहकार्य करीत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. चुका असतील तिथे विरोधक आम्हाला विरोध करतात पण विकासकामांना साथ देतात. मागील पाच वर्षात तत्कालीन आमदार खासदार व राज्य शासनाने आम्हाला विकास कामांसाठी एक रुपयाचा निधी दिला नसल्याचे यावेळी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांनी चांगल्या प्रकारे काम करीत असून कोरोनाची परिस्थिती असताना राज्य सरकार व्यवस्थित चालविले आहे. तरी पण विरोधी पक्षाची मंडळी हे सरकार कधी पडते ह्याची वाट पहात आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार मध्ये तिन्ही पक्षाचा उत्तम ताळमेळ असून हे सरकार 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर ह्यांनी केले. शाखा अभियंता स्वप्नील काकड ह्यांनी विविध विकास कामांची माहिती दिली.
यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळघट, शहाजी जाधव, विलास तनपुरे, अशोक आहेर, गजानन सातभाई, विजय करपे, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, संजय साळवे, संतोष आघाव, पांडुरंग उदावंत, नंदू गागरे, मच्छिंद्र कर्डीले, दत्तू शेटे, पाटीलबा डावखर, अक्षय सांगळे, ओंकार कासार, ऋषीकेश म्हसे, पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपगराध्यक्ष बाळासाहेब उंडे ह्यांनी आभार मानले.