कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशी गाईंचे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा शुभारंभ
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : कृषि महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गीर देशी गाईच्या भ्रूण प्रत्यारोपणाच्या तंत्रज्ञानाचा शुभारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाला. हे तंत्रज्ञान देशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे असून सदर भृण प्रत्यारोपण या तंत्रज्ञानाचा वापर राहुरी सिमेन स्टेशन, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या समन्वयाने होत आहे. याप्रसंगी डॉ. गडाख म्हणाले की या तंत्रज्ञानाचा विस्तार शेतकर्यांच्या शेतावरती झाल्यास दुग्धव्यवसाय व चांगल्या वंशावळीच्या देशी गाई निर्माण होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.
सदरचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये प्रथमच होत असून देशामध्ये शुद्ध जातीच्या गाई पैदाशीसाठी हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये देशी गोसंवर्धनाचे कार्य वेगाने होण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा ठरणार असून शुद्ध जातींच्या गाईंची पैदास या तंत्रज्ञानाद्वारे जलद गतीने होणार आहे. याप्रसंगी राहुरी सिमेन स्टेशनचे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील, डॉ. जनार्दन कातकडे, डॉ. देवेंद्र स्वामी, पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, देशी गाय व संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे आणि डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते.