पाण्याने भरलेल्या खड्डयात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
विजय चिडे/पाचोड : घरातील सदस्य घर कामत व्यस्त असता घरात खेळता खेळता घरामधून बाहेर गेलेल्या दिड वर्षीय चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या खड्डयात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पांरूडी येथे बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली असून शिवराज दत्ता नलावडे असे त्या मृत्यू झालेल्या लहान चिमुकल्याचे नाव आहे.
अधिक माहीती अशी की, पांरूडी येथील नलावडे कुंटूब हे गेल्या काही दिवसापासून आपल्या शेतात कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. परंतु बुधवारी दुपारी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने घरा शेजारील असणाऱ्या खड्डयात पाणी साचले होते. शिवराजची आई ही काही कामानिमित्त घराबाहेर पडली.
यावेळी घरामध्ये शिवराज सोबत त्यांची आत्या होती. त्याची आई घरी परतल्यानंतर तिने शिवराज बद्दल विचारले असता त्याच्या आत्याने तो घरात असल्याचे सांगितले होते. परंतु शिवराज हा घरात दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता तो कुठेच दिसत नसल्याने बाजूच्या पाण्याने भरलेल्या खड्डयात त्याचे डोक खाली आणि पाय वर अशा अवस्थेत आढळला. शिवराज च्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याला बेशुद्धावस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.