अहिल्यानगर
राहुरीत बाल संगोपन योजना शिबीर संपन्न
राहुरी प्रतिनिधी : कोविड मध्ये एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे वतीने बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा महिला व बाल कल्याण समितीचे वतीने राहुरी येथील पंचायत समितीच्या स्व. डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात कोरोनाने मयत झालेली एक किंवा दोन्ही पालकांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देणेसाठी व परिपूर्ण प्रस्ताव जमा करण्यासाठी दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिबीर आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी तसेच अहमदनगर जिल्हा समन्वयक अशोक कुटे, मनीषा कोकाटे आणि राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी राऊत, तालुका संरक्षण अधिकारी शुभदा शेळके यांचे विनंतीवरून जिल्हा बाल कल्याण समिती व जिल्हा महिला बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अहमदनगर विभागाचे वतीने आज तालुका स्तरावर उपरोक्त शिबीर आयोजित करण्यात होते.
या शिबिरासाठी जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मा. हनिफ शेख, जिल्हा बाल कल्याण समितीचे सदस्या ॲड जोत्स्ना कदम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, सर्जेराव शिरसाठ, क्षेत्रीय कार्यकर्ते श्रद्धा मुसळे, रुपाली वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघ, बाळू साळवे, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे आदी या शिबीर प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी शिबिरास उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांनी वृक्ष भेट देऊन स्वागत केले.
या एक दिवशीय शिबिर प्रसंगी कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तथापी तालुक्यातील जवळपास केवळ पन्नास टक्के लाभार्थी या शिबिरास उपस्थित राहिले असलेने उर्वरित लाभार्थी बाल संगोपन योजनेपासून वंचित राहू नये व राहुरी तालुका एकल महिला पुनर्वसन समितीवर अशासकीय सदस्य लवकर नेमावा आणि तालुक्यातील बाल संगोपन योजनेचे फॉर्म भरणे बाकी राहिलेल्या जवळपास पन्नास टक्के लाभार्थी साठी तालुक्यात पुन्हा शिबीर आयोजित करावे अश्या आशयाचे विनंती पत्र या प्रसंगी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे यांनी जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मा. हनिफ शेख यांना दिले. तालुक्यात महामहिम राज्यपाल यांचा दौरा असतानासुद्धा राहुरीचे एकल महिला पुनर्वसन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार फसीयोद्दीन शेख व सचिव तथा महिला बाल विकास अधिकारी राऊत यांनी सदर शिबीर यशस्वी होणेसाठी अथक परिश्रम घेतले.