कृषी
अन्नधान्यात स्वयंपूर्णतेचे श्रेय कृषि शास्त्रज्ञांना – कृषि आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा
केंद्रिय कृषि आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांची कृषि विद्यापीठास भेट
राहुरी विद्यापीठ : कृषि क्षेत्र हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सर्वोकृष्ट कार्य केलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर, हायपर स्प्रेट्रम तंत्रज्ञानाचा वापर, रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंचलीत हवामान केंद्र व सिंचन प्रणाली यामध्ये उत्कृष्ट काम सुरु आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन तंत्रज्ञान ते मुल्यवर्धन व त्याचे विपणन अशी साखळी तालुका स्तरावर तयार करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात स्वयंचलीत हवामान केंद्र स्थापन करण्याचे धोरण लवकरच केंद्र सरकार आखत आहे. देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला आहे याचे श्रेय पूर्णपणे कृषि शास्त्रज्ञांच्या संशोधनाला जाते असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारचे कृषि अणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारत सरकारचे कृषि आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, भारत सरकारचे कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव श्री. अभिलक्ष लिखी, आयुक्त (उद्यान) डॉ नविनकुमार पटले, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे उपसंचालक होशियार सिंग, ॲगमार्कचे विपणन विभागाचे संचालक बी.के. जोशी, विपणन अधिकारी सौ. सोनाली बागडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे व सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
अतिरिक्त सचिव अभिलक्ष लिखी म्हणाले या कृषि विद्यापीठाने भरडधान्यामध्ये चांगले संशोधन केलेले आहे. सन 2023 हे आंतराष्ट्रीय पौष्टीक भरडधान्य वर्ष असल्याने या विद्यापीठात 2023 मध्ये भरडधान्यावर राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करावे. यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले विद्यापीठाने विकसीत विविध पिकांचे वाण हे राज्यातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही घेतले जातात. यामध्ये विद्यापीठाने विकसीत डाळिंबाचा भगवा हा वाण देशात डाळिंबाच्या 80 टक्के क्षेत्रावर लावला जातो. राज्यातील उसाखालील क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्र हे या विद्यापीठाच्या विकसीत वाणांखाली आहे. विद्यापीठाच्या मुलभुत बियाण्याची किंमत ही प्रामाणीत बियाण्यापेक्षा कमी असून ती प्रामाणीत बियाण्यापेक्षा तीन पट असावी असे धोरण शासनाने करावे. आर.के.व्ही.वाय. अंतर्गत गुजरात राज्यात 20 टक्के निधी दिला जातो तर महाराष्ट्र राज्यात तो दोन टक्के दिला जातो, तो निधी वाढविणे गरजेचे आहे. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठाचा शिक्षण, संशोधन व विस्ताराचा आढावा सादर केला. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट-कासम प्रकल्पात सुरु असलेल्या संशोधनसंदर्भात माहिती दिली व मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. महानंद माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी मान्यवरांनी विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाच्या ड्रोन प्रयोगशाळा, आय.ओ.टी. तंत्रज्ञानचलीत सिंचन प्रणाली, रोबोटीक्स तंत्रज्ञान प्रयोगशाळा, आय.ओ.टी. पार्क, फळबाग प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, कास्ट-कासम प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला भेटी दिल्या. यावेळी मान्यवरांना ड्रोनद्वारे औषधाची फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. सुनिल कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. राजेंद्र हिले, डॉ. जोशी यांनी माहिती दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.