छत्रपती संभाजीनगर

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक पोलीसांच्या नजरकैदेत

 
मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना दाखवणार होते काळे झेंडे 

◾पैठण एमआयडीसी व बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत धरपकड सञ

विलास लाटे/पैठण : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्ताने (दि.१७) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात आले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्या दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता. यावरुन पोलिस प्रशासनाने खबरदारीची भुमिका घेत शहर व ग्रामीण भागातील मराठा समन्वयकांची काल राञी पासुनच धरपकड सुरू करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात आशी मागणी सातत्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा समाजाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही मुख्यमंञी ठाकरे यांचा ताफा अडवुन काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे असा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने इशारा देण्यात आला होता. आंदोलनाच्या तयारीत असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी यांची काल राञी पासुन धरपकड करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक किरण काळे पाटील व कृष्णा पाटील उघडे यांना काल राञीपासुनच पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.भागवत नागरगोजे, राजु चव्हाण, राम मारकळ यांनी ताब्यात घेतले होते. तर बिडकीन येथे स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे, संतोष कुसेकर, दत्ता पाटील मोगल, विजय शेळके, आप्पासाहेब जाधव, अनिल कुटे, धनंजय चिरेकर, नारायण नरवडे, किशोर जाधव, गणेश जाधव हे सर्व पदाधिकारी आज सकाळी आठ वाजता वाहणात बसुन झेंडे घेऊन औरंगाबादकडे आंदोलनाच्या तयारीत असतांनाच बिडकीन पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष माने यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.मोरे, शिवानंद बनगे यांनी सर्व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी बिडकीन येथिल निलजगा फाट्यावर मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. मुख्यमंञी ठाकरे हे औरंगाबाद शहरातील सर्व शासकीय दौरा आटोपून मुंबईला परत पोहचतील तेव्हा मराठा आंदोलकांना सोडण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आंदोलन तिव्र करणार…

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात.सरकारने मराठा समाजाला खोटी अश्वासने देऊन आमची फसवणूक केली आहे.आम्ही सर्व पदाधिकारी आज मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवुन काळे झेंडे दाखवणार होतो.माञ सरकार पोलीस प्रशासनाला पुढे करून आंमच आंदोलन दडण्याचा प्रयत्न सतत करत आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने आम्ही राज्यभरात तिव्र आंदोलन हाती घेतले असुन जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकाही मंञी,खासदार,आमदाराला आम्ही कुठेही फिरकु देणार नाही.मराठा आंदोलन अधिक तिव्र करणार आहोत. 

   -किरण काळे पाटील (समन्वयक,मराठा क्रांती ठोक मोर्चा)

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button