छत्रपती संभाजीनगर

लग्नासाठी काय पण; चिखल तुडवत येईन पण तुला घेऊनच जाईन…

नवरदेव रानावनातून चिखल तुडवत जात असताना टिपलेले छायाचित्र.
अन् चक्क वऱ्हाडीसह नवरदेवावर तीन किलोमीटर चिखल तुडविण्याची नामुष्की…. !

पाचोड /विजय चिडे : सकाळी लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण…. सर्वत्र नातेवाईक, मित्र आप्तेष्टांना आमंत्रण दिल्याने सायंकाळीच घरी मांदीयाळी, अन् अचानक मध्यरात्रीपासुन पाऊस सुरू होऊन गाव अन् मुख्य रस्त्याचा संपर्क तुटून नवरदेवासह वऱ्हाडी मंडळीवर तीन किलोमीटर रानावनाने चिखलातून वाट काढत मुख्य रस्ता गाठावा लागल्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र पैठण तालुक्यातील दावरवाडी तांडा येथे मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी पाहवयास मिळाले.

दावरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तांडागाव मुख्य गाव व सोनवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर पस्तीस उंबऱ्याची वस्ती आहे. तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने लग्नाचा बार उडवून दयावा म्हणुन शेषराव राठोड यांनी त्यांचा मुलगा अमोल याचा विवाह मंगळवारी (दि.३१) सुखापूरी (ता.अंबड ) येथे करण्याचे ठरविले. यासाठी सर्व नातेवाईक – मित्र आप्तेष्टांना बोलविण्यात आले. वऱ्हाड नेण्यासाठी वाहन लावण्यात आले, अन् रात्रीला अचानक धो… धो… पाऊस आला व तांडा व मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला. वाहन गावापर्यंत येत नसल्याने तिन किलोमीटरपर्यंत नवरदेवासह वऱ्हाडीना रानावनाने कमी अंतर कापण्यासाठी पिकांतून रस्ता काढत गुडघाभर चिखल… पाणी तुडवत सोनवाडीजवळ थांबलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत दमछाक सहन करीत जावे लागले. यांत नटलेले नवरदेव, वऱ्हाडी चिखल मातीत भरून बेनूर झाल्याने दिवसभर हा विषय चर्चेचा बनला.

पावसाळ्याची चार महीने या तiड्यावरील नागरिकाना रस्त्यांसाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. शासन सर्व तांडे -वस्त्या मुख्य रस्त्यास जोडण्याची घोषणा करीत असले तरी शेकडो तांडे व वस्त्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही उपेक्षित आहे. जेथे रस्ता नाही तेथे बसचा विचार न केलेला बरा. येथील पन्नासवर विद्यार्थ्यांना दावरवाडी व सोनवाडी येथे शाळेस जातात, मात्र अनेकास रस्त्याअभावी शाळा सोडावी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

” या रस्त्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली, परंतु हा रस्ता तयार करण्यासाठी कुणी गांभीर्याने घेतले नाही. आज नातेवाईकासमोर आमची फाजती होऊन नाचक्की झाली, एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी जर गावातील कोणी आजारी पडला तर  तर त्यास दवाखान्यात सुध्दा वेळेवर नेता येत नाही. मायबाप सरकारने जातीने लक्ष देऊन हा रस्ता आम्हाला बनवून द्यावा .”

– पंढरीनाथ राठोड (ग्रामस्थ तांडा)

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button