अहिल्यानगर
गेल्या वीस वर्षापासून जिल्ह्याबाहेर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्याची संधी
आज पासून शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू; खुल्या प्रवर्गाला मिळणार न्याय
अहमदनगर : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला आज पासून ( दिनांक 18 ) राज्यात सुरुवात होणार आहे. गेल्या वीस वर्षापासून अन्य जिल्हा परिषदेमध्ये प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या अहमदनगरच्या भूमीपुत्रांना स्वजिल्ह्यात येण्याची संधी अहमदनगर जिल्हा परिषदेचे रोस्टर वेळेत मागासवर्गीय आयोग नाशिक यांचेकडून तपासणी करून आल्यामुळे मिळणार आहे.
सध्या शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा बदल्यांची देखील तयारी जोरदार सुरू आहे. शिक्षकांना आंतरजिल्हा बदली करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची संधी असते. राज्यात अनेक जिल्हा परिषदेची रोस्टर अद्यापही अपूर्ण असताना अहमदनगर जिल्हा परिषदेने मात्र प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर वेळेत पूर्ण केले आहे.
यामध्ये मुख्यकार्यकारी आशिष येरेकर यांनी स्वतः लक्ष घालून शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी विशेष कष्ट घेऊन जिल्हा परिषदेचे रोस्टर वेळेत पूर्ण करून घेतले. त्यामुळे सर्वच प्रवर्गाच्या मिळून 450 पेक्षा जास्त रिक्त जागा झाल्याने मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्रांना याचा फायदा होणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून खुल्या प्रवर्गाच्या शिक्षकांसाठी अहमदनगर जिल्हापरिषदेची जी दारे बंद होती ती यावर्षी उघडी झाली आणि खुल्या प्रवर्गाच्या 131 पेक्षा जास्त जागा अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे किमान 150 पेक्षा जास्त बदल्या या खुल्या प्रवर्गाच्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासाठी जयदीप मोकाटे व त्यांची टीम यांनी अहोरात्र विशेष कष्ट घेऊन सर्वच प्रवर्गातील शिक्षकांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भूमीपुत्रांना आपल्या स्वजिल्ह्यात येण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यकार्यकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण तसेच अहमदनगर जिल्हा शिक्षण विभागाचे कर्मचारी यांचे सर्व आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षकांकडून आभार मानण्यात आले. तसेच यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या जयदीप मोकाटे व टीमचे देखील कौतुक शिक्षकांमधून होत आहे.
आंतरजिल्हा बदली प्रश्न काही अंशी सोडविण्यात आल्याचा आनंद व समाधान वाटत आहे. या पुढील दोन ते तीन वर्षात आंतरजिल्हा बदली प्रश्न पूर्णतः सोडविण्याचा मानस आहे._ जयदीप मोकाटे; शिक्षक नेते