ठळक बातम्या
भाजप शासनाला केंद्र व राज्यातून पायउतार करण्याची वेळ – आ. मिटकरी
राहुरी | बाळकृष्ण भोसले – देशभक्ती सिद्ध करण्याच्या क्लूप्त्या आखणाऱ्या भाजप पक्षाचे पितळ उघड पडत आहे. तिरंगा आमच्या हृदयात आहे. सन २०२२ साली शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होणार व प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा हवेत विरली. शेतकरी देशोधडीला लागत असताना शिंदे-फडणवीस शासनामार्फत राज्यातील जनतेचा अपमान सरू आहे. विकास कामे थांबलेली असताना विकास कामांना दिलेला निधी थांबविला जात आहे. त्यामुळे भाजप शासनाला केंद्र व राज्यातून पायउतार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आ. अमोल मिटकरी यांनी केले. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील बाजारतळावर आयोजित सभेत ते बोलत होते. ५४ कोटी रूपये निधी उपलब्ध झाल्यानंतर ब्राम्हणी, चेडगाव, मोकळओहोळ, उंबरे, प्रिंप्री अवघड, कुक्कढवेढे, सडे या सात गावांसाठी लाभदायी ठरणार्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आ. प्राजक्त तनपुरे हे होते.
आ. मिटकरी यांनी भाजप पक्षाच्या भुमिकांबाबत चौफरे हल्ला चढविला. त्यांनी सांगितले की, ज्या देशातील महान व्यक्तींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध केला त्याच महापुरूषांच्या नावाचा वापर करून जनतेमध्ये भ्रम पसरविला जात आहे. वेगवेगळे नावाचे पक्ष राजकारणामध्ये कार्यरत आहेत. परंतु शिंदे आडनावाचा पक्ष तयार केल्याचा भिमपराक्रम भाजपने केला आहे. संविधानापेक्षा मनुस्मृतीला महत्व देणार्या भाजप पक्षाकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. विकास कामे न करता छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मंजूर केलेला ३५० कोटीचा निधी रद्द केला. शिंदे-फडणवीस शासनाने केलेला पाप जनता विसरणार नाही. शेतकर्यांना अडचणीत आणण्याचा खटाटोप सुरू आहे. शेती पीकांशी संबंधित अनेक गोष्टींवर जीएसटी नावाचा जाचक कर आकारणी केली जात आहे. शेती साधनांसह खते व बीयाणांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केली. २०२२ मध्ये शेतकर्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यासह प्रत्येक भारतीयाला हक्काचे घर देण्याचे दिव्यस्वप्न दाखविले. परंतु सर्व घोषणा हवेत विरल्या. देशभक्तीच्या नावाखाली भाजप पक्ष आपले प्रसिद्धीचे फंडे वापरत आहे. शिंदे-फडणवीस शासन स्थापन होऊन ४० दिवसांचा काळ उलटला. परंतु खातेवाटप होत नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे. शेतकरी उदासिन आहे. अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट असताना ४० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. याबाबत आता कोणी चकार शब्द बोलत नाही. महिला अत्याचारावर महाविकास आघाडी शासनावर सकाळ-संध्याकाळ टिकेची झोड उठविणार्या चित्रा वाघ यांना महिला अत्याचार दिसेनासे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांवर ईडी कारवाई करणार असल्याचे सांगत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आता शिंदे गटाचे गोडवे गात आहे. भाजप पक्षाने राजकारणात नीच पातळी गाठली आहे. खाते वाटपावरून वादंग सुरू झाले आहे. शिंदे गटाचे १० आमदार नाराज आहेत. शिंदे-फडणवीस शासन टिकणारे नाही. विकास कामे न करता महाविकास आघाडी शासनाने विकास कामांना दिलेला निधीही थांबविला. यामुळे जनता भाजप पक्षाचा दुटप्पीपणा ओळखून आहे. कधीही निवडणुका झाल्यास जनता आता भाजपच्या बेगडी देश भक्तीला उघड केल्याशिवाय राहणार नाही असे आ. मिटकरी यांनी सांगितले.
आ. तनपुरे म्हणाले की, शिंदे-फडणवीस शासनातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस शासन फार काळ टिकणारे नाही. त्यामुळे मी नव्हे तर आम्ही पुन्हा येवू हा नारा देत पुन्हा महाविकास आघाडी शासनाची सत्ता राज्यात येणार आहे. मंत्र्यांचे खातेवाटप तर दुसरीकडे जिल्ह्याला पालकमंत्रीपद नसल्याने विकास कामांची वाताहात झालेली आहे. माजी अर्थमंत्री अजित पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्याला ६०० ते ८०० कोटी रूपयांचा विकास निधी जिल्हा नियोजनातून लाभला होता. पावसाळ्यात रस्त्यांसह जनसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर झालेला निधी शिंदे-फडणवीस शासनाने थांबविला. विकास कामे न करता विकास कामांना बे्रक लावले आहे. ब्राम्हणी पाणी योजना मागिल शासन काळात माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी मंजूर करून आणल्याचा गवगवा केला. परंतु सत्ता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता मंत्रालयात संबंधित योजना होणार नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळे ब्राम्हणी पाणी योजनेचा पुनर्लेखण केले. चेडगाव व मोकळ ओहोळ या दोन गावांचा समावेश केला. मुळा धरणाचे हक्काचे पाणी संबंधित सात गावांना मिळणार असल्याचे मोठे समाधान लाभत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रास्ताविक योजनेचे अध्यक्ष चंद्रकांत पानसंबळ यांनी केले तर माजी उपसरपंच डॉ. राजेंद्र बानकर, विठ्ठल मोकाटे गुरूजी, नवाज देशमुख, सरपंच संजय खरात, कुक्कढवेढे सरपंच दीपक मकासरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दत्तात्रेय अडसुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, भारत तारडे, रविंद्र आढाव, किसन जवरे, दिलीप जठार, बाळासाहेब लटके, माणिक तारडे, के.एम.पानसरे, साहेबराव दुशिंग, सचिन ठुबे, सुभाष आढाव, संजय तरवडे, रामभाऊ पानसरे, भानुदास कदम, सुरेश सावळे, बापुसाहेब दुशिंग, संतोष हापसे, सचिव श्रीकांत साळे, धीरज पानसंबळ, धनंजय पानसंबळ, सरपंच सौ. परवीन शेख, लहानू तमनर, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खुळे, मिलिंद अनाप, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत, आदिनाथ तनपुरे, खतीबभाई देशमुख आदींसह सात गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. आभार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी तर सुत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.