राहुरीत दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय व कॅलिपर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

राहुरी प्रतिनिधी : दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून राहुरी येथे विस्टीऑन नम्मा आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट, दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ब्रँडेड कंपनीचे इम्पोर्टेड कृत्रिम पाय व कॅलिपर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विस्टीऑन हेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रभू राऊत व प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सिद्धार्थ बांगर (नम्मा आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट), अश्विनी बनसोडे, समीक्षा एस, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार, व जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात मधुकर घाडगे यांनी प्रहार संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या फायद्यासाठी वर्षभर उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू राऊत यांनी विस्टीऑन कंपनीतर्फे दिव्यांगांसाठी सातत्याने काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी 30 दिव्यांग बांधवांना मोफत इम्पोर्टेड कृत्रिम पाय व कॅलिपर प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव म्हणाले, “नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी मोठा लढा उभारण्याची गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 130 शासन निर्णय काढण्यात आले असून, त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.”
यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुकाध्यक्ष योगेश लबडे, तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले, तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र माहीम (मुंबई) चे अध्यक्ष शेरसिंग राठोड यांनी कृत्रिम पाय बसविण्याची प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे, नगर शहराध्यक्ष संदेश रपारिया, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पाहुण्यांचे आभार शाखाध्यक्ष विजय म्हसे यांनी मानले.