डॉ. मकासरे राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्काराने सन्मानित
राहुरी | जावेद शेख : ध्येय उद्योग समूह पुणे व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार 2024 डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार, दि. २१ जुलै २०२४ रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
डॉ. विजय मकासरे यांनी महाराष्ट्र गुटखाबंदी करण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ते यशस्वी केले. राज्यभर दारूबंदीसाठी प्रयत्न केले. रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ व दिन दुबळ्या लोकांना कपडे, चपला देऊन त्यांना अनाथ आश्रमात पोहोचवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले. कोवीड काळात ॲम्बुलन्स नसताना त्यांच्या गाडीतून पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचे काम करून रुग्णांचे प्राण वाचविले. त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांचे उपचारांचा सर्व खर्चही उचलला. राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार याबाबत मिळाला आहे. गाव पातळीवर दारूबंदीसाठी प्रयत्न केले. अनेक भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलने केली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ.सर्जेराव निमसे, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक नितीन एडके हे होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगिर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले.